माॅस्काे : रशिया-युक्रेन युद्धावर ताेडगा काढण्याचे प्रयत्न सुरू असतानाच, दुसरीकडे दाेन्ही देशांच्या संघर्षात आता ‘नाटो’चे (उत्तर अटलांटिक करार संघटन) नाव ओढले गेले आहे.
अमेरिकेने दिलेल्या लांब पल्ल्याच्या घातक क्षेपणास्त्राचा वापर करण्याची परवानगी नाटो देशांनी युक्रेनला दिली आणि रशियाच्या आतील भागांत हल्ला झाला तर याला सर्वस्वी ‘नाटो’ जबाबदार असेल, असा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी दिला आहे. असे हल्ले झालेच तर ती ‘नाटो’ देश थेट या युद्धात उतरले असल्याचे मानले जाईल, असेही पुतिन यांनी बजावले आहे.
रशियाला भीती का?
अमेरिकेने ऑक्टोबर २०२३ मध्ये युक्रेनला लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे पुरवली होती. या क्षेपणास्त्रांचा पल्ला सुमारे २९० कि.मी. आहे. या क्षेपणास्त्रांच्या वापराची परवानगी युरोपीय राष्ट्रांतील समर्थक देशांनी आपल्याला द्यावी, अशी मागणी युक्रेन सातत्याने करत आहे. या पार्श्वभूमीवर रशियाने हा इशारा दिला आहे.
पुन्हा शस्त्रपुरवठा...
इस्रायल-पॅलेस्टाइन युद्धात अमेरिका इस्रायलच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. इस्रायलला आधुनिक शस्त्रपुरवठ्यासाठी अमेरिकेने १६५ दशलक्ष डॉलरच्या करारास मंजुरी दिली असून, यात विविध आधुनिक प्रणालींसह दुरुस्तीसाठी सुटे भाग, तांत्रिक सहकार्य आहे.