कीव्ह : युक्रेनची राजधानी कीव्हजवळच्या देसना शहरात रशियाने क्षेपणास्त्र हल्ला केला हाेता. त्यात ८७ नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावा राष्ट्राध्यक्ष वाेलाेदिमिर जेलेन्स्की यांनी केला आहे. केवळ ४ क्षेपणास्त्रांनी हे बळी घेतल्याचे जेलेन्सकी म्हणाले. रशियाने आतापर्यंत २ हजारांहून विविध क्षेपणास्त्रांचा मारा केल्याचाही दावा त्यांनी केला आहे.
युद्धाला तीन महिने पूर्ण हाेण्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी देशाला उद्देशून भाषण केले. त्यावेळी त्यांनी माहिती देताना सांगितले, की चेर्निहाईव्ह भागातील देसना शहरावर माेठा हल्ला झाला हाेता. तेथील मलबा हटविण्याचे काम पूर्ण झाले आहे. या हल्ल्यात ८७ जणांचा मृत्यू झाला आहे. केवळ ४ क्षेपणास्त्रांनी एवढ्या माेठ्या प्रमाणावर विध्वंस केला आहे. रशियाने आतापर्यंत १ हजार ४७४ वेळ क्षेपणास्त्र हल्ले केले असून त्यात २ हजार २७५ विविध क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला आहे. तसेच, ३ हजारांहून अधिक वेळा हवाई हल्ले केले असून त्यात बहुतांश वेळा नागरी वसाहतींना लक्ष्य करण्यात आल्याचे जेलेन्स्की म्हणाले. (वृत्तसंस्था)
लुहान्स्कमधून नागरिकांचे स्थलांतररशियाने लुहान्स्क भागावर हल्ले तीव्र केले आहेत. त्यामुळे तेथून माेठ्या प्रमाणावर नागरिक बाहेर पडत असल्याचे तेथील गव्हर्नर सेरही हैदई यांनी सांगितले. हैदई यांनी एक व्हीडिओ साेशल मीडियावर पाेस्ट केला. त्यात मलबा, नष्ट झालेली वाहने, बॅरिकेड इत्यादी दिसत आहे.