लुहान्स्कचा ९७ टक्के भूभाग काबीज : रशियाचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 05:30 AM2022-06-08T05:30:55+5:302022-06-08T05:31:10+5:30
Russia : रशियाने गेल्या काही आठवड्यांपासून डाेनबास भागाकडे माेर्चा वळविला आहे. सीव्हेराेडाेनेत्स्क शहराचा ताबा रशियन सैन्याने घेतला आहे. लुहान्स्क भागाचे हे शहर प्रमुख केंद्र आहे.
कीव्ह : युक्रेनच्या पूर्वेकडील भागात माेठी आघाडी घेतल्याचा दावा रशियाने केला असून, या भागात आणखी सैनिकांना पाठविण्यात आले आहे. लुहान्स्क क्षेत्राचा ९७ टक्के भाग काबीज केल्याचे रशियाचे संरक्षणमंत्री सर्गेई शाेईगू यांनी म्हटले आहे.
रशियाने गेल्या काही आठवड्यांपासून डाेनबास भागाकडे माेर्चा वळविला आहे. सीव्हेराेडाेनेत्स्क शहराचा ताबा रशियन सैन्याने घेतला आहे. लुहान्स्क भागाचे हे शहर प्रमुख केंद्र आहे. आता जवळपासची शहरे व एका औद्याेगिक क्षेत्राचा ताबा घेण्याचा रशियाचा प्रयत्न सुरू आहे.
तीन महिन्यांनी उघडले नाट्यगृह
रशियाने पूर्व युक्रेनकडे माेर्चा वळविल्यानंतर राजधानी कीव्हमध्ये तीन महिन्यांनी नाट्यगृह उघडण्यात आले. त्याचा शाे हाउसफुल हाेता. नागरिकांचा कसा प्रतिसाद असेल, याबाबत शंका हाेती. मात्र, युक्रेनी जनतेने सर्व शाेला भरभरून प्रतिसाद दिला. (वृत्तसंस्था)
युक्रेनी सैनिकांचे मृतदेह दिले परत
मारियुपाेलमधील एझाेवत्साल पाेलाद कारखान्यात मृत्युमुखी पडलेल्या युक्रेनच्या सैनिकांचे मृतदेह युक्रेनच्या ताब्यात देण्यात आले आहेत. त्यांची ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणी करण्यात येत आहे. या कारखान्याचा रशियाने ताबा घेतला आहे. त्यासाठी झालेल्या संघर्षात किती युक्रेनी सैनिक मारले गेले, याचा आकडा स्पष्ट झालेला नाही.