खारकीव : रशिया व क्रिमियाला जोडणाऱ्या एका पुलावर शनिवारी ट्रकमध्ये ठेवलेल्या बॉम्बच्या स्फोटात तिघांचा मृत्यू झाला. हे घातपाती कृत्य युक्रेनने केल्याचा आरोप क्रिमियातील रशियाचा पाठिंबा असलेल्या लोकप्रतिनिधी गृहाने केला आहे. मात्र, त्याबाबत रशियाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.
या बॉम्बस्फोटात पुलाचा काही भाग उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळे रशिया व क्रिमियातील रसद पुरवठ्यावर त्याचा परिणाम होणार आहे. या पुलावर हल्ला चढविण्याचा युक्रेनने याआधीही इशारा दिला होता. मात्र, युक्रेन सरकारने शनिवारच्या बॉम्बस्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या ७०व्या वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी हा बॉम्बस्फोट झाला आहे.
१९ किलोमीटर लांबीचा पूल nकाळ्या समुद्रानजीकचा भाग व अझोव येथील समुद्रकिनाऱ्याचा प्रदेश यांना जोडणारा हा पूल १९ किलोमीटर लांबीचा आहे. nरशियाने २०१४ साली क्रिमियाचा भाग बळकावला होता. युक्रेनविरोधात रशियाने यंदा फेब्रुवारी महिन्यात युद्ध सुरू केले. काही दिवसांपूर्वी युक्रेनचे चार प्रदेशही रशियाने बळजबरीने विलीन करून घेतले आहेत. nहे विलिनीकरण अवैध असल्याची टीका युक्रेन तसेच अमेरिकेसह इतर पाश्चिमात्य देशांनी केली होती.