'भारतीय औषध कंपनीवर रशियाने केला मुद्दाम हल्ला'; नव्या हल्ल्यात ३२ जण ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 09:36 IST2025-04-14T09:34:58+5:302025-04-14T09:36:11+5:30
Russia Attack Pharmaceutical Company Ukraine: या हल्ल्याबाबत भारत किंवा रशिया या दोन्हीपैकी एकाही देशाने अद्याप भाष्य केलेले नाही.

'भारतीय औषध कंपनीवर रशियाने केला मुद्दाम हल्ला'; नव्या हल्ल्यात ३२ जण ठार
किव्ह (युक्रेन) : युक्रेनची राजधानी किव्हमध्ये असलेल्या भारतातील प्रसिद्ध औषध कंपनी ‘कुसूम’च्या गोदामावर रशियाने केलेल्या ड्रोन हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. भारताशी मैत्रीचा दावा करणाऱ्या रशियाने मुद्दाम या उद्योगावर हल्ला केल्याचा आरोप युक्रेनने केला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दरम्यान, रशियाने केलेल्या या हल्ल्याबाबत भारत किंवा रशिया या दोन्हीपैकी एकाही देशाने अद्याप भाष्य केलेले नाही.
वृद्ध, मुलांसाठीची औषधे नष्ट
रशियाने केलेल्या या हल्ल्यात भारतीय कंपनीच्या गोदामात असलेली अत्यंत महत्त्वाची औषधे नष्ट झाल्याचे युक्रेनच्या वकिलातीने म्हटले आहे. या औषधांचा वापर प्रामुख्याने वृद्ध नागरिक आणि लहान मुलांच्या आजारांवर उपचारांसाठी केला जात होता.
राजीव गुप्ता यांची मालकी असलेली कुसूम फार्मा ही युक्रेनला औषधांचा पुरवठा करणारी सर्वांत मोठी कंपनी आहे. युक्रेनला नित्य गरजेच्या औषधांचा पुरवठा करणारी ही कंपनी प्रमुख स्रोत आहे. या गोदामावरच ड्रोनने हल्ला करून रशियाने हे मोठे गोदाम नष्ट केले आहे.
ब्रिटनने केला निषेध
युक्रेनमधील ओषधाच्या गोदामावर रशियाने केलेल्या हल्ल्याचा ब्रिटनने तीव्र निषेध करून या हल्ल्याची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत.
११ मुलांचा गेला जीव; जास्तीतजास्त मृत्युंसाठी रशियाची नवी अस्त्रे
युक्रेनच्या सुमी शहरावर रविवारी रशियाने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात किमान ३२ नागरिक ठार, तर ९९ लोक जखमी झाले.
त्यात ११ मुलांचा समावेश आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात सकाळी स्थानिक प्रमाणवेळेनुसार सव्वादहाच्या सुमारास दोन क्षेपणास्त्रे धडकली.
अनेक जळालेल्या मृतदेहाच्या बॅग रस्त्याच्या कडेला पडलेल्या दिसत होत्या, तर काही मृतदेह ब्लॅकेटमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत होते. या हल्ल्यात इमारतींच्या ढिगाऱ्यात जळालेल्या कारही दिसत होत्या.
या हल्ल्यात जास्तीत जास्त जीवितहानी व्हावी म्हणून रशियाने क्लस्टर युद्धसामग्रीचा वापर केला असल्याचे युक्रेनच्या सूत्रांनी सांगितले. युक्रेनमधील शहरांवर नागरी वस्त्यांत रशियाने केलेला हा दुसरा मोठा हल्ला आहे.