रशियाच्या मिसाईल हल्ल्यात युक्रेनचा सर्वात मोठा पॉवरप्लांट उद्ध्वस्त; वीजतुटवड्याच्या संकटाची भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 10:36 AM2024-04-12T10:36:05+5:302024-04-12T10:36:41+5:30
Russia destroyed Ukraine Powerplant: संपूर्ण देशाच्या १०% वीजनिर्मिती या एका पावरप्लांटमधून केली जात होती. पण हल्ल्यामुळे आता वीजनिर्मिती ठप्पा झाली आहे.
Russia destroyed Ukraine Powerplant: रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध अजूनही आक्रमकपणे सुरूच आहे. गुरुवारी रशियाने युक्रेंच्या कीव क्षेत्रात असलेल्या सर्वात मोठ्या पावर प्लांटला मिसाईलने नष्ट केले. युक्रेनच्या राजधानी पासून सुमारे 25 किलोमीटर दूर असलेल्या दक्षिणेकडील ट्रिपिलिया पावरप्लांट (Trypillya power plant) वर रशियाने सहा मिसाईल्स डागली. या हल्ल्यामध्ये मिसाईलच्या स्फोटाने टर्बाइन हॉलमध्ये पूर्णपणे आग लागली. ज्यामुळे आता वीज निर्मिती पूर्णपणे ठप्प झाली आहे.
हा हल्ला रशियाने युक्रेन वर केलेल्या व्यापक मिसाईल हल्ल्यांपैकी एक मानला जात आहे. या हल्ल्यामध्ये पाच क्षेत्रांतील पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात आले. रशियन सैन्याने युक्रेन मधील हवाई दलाच्या विश्रांतीचा फायदा घेत हा हल्ला घडवून आणला. गेल्या काही आठवड्यांपासून रशियाने युक्रेनमधील पूर्वेकडील भागात आपल्या सैन्याची मजबुती करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे लवकरच या भागातही रशियाकडून एखादा मोठा हल्ला केला जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
ट्रिपिलिया प्लांटवर करण्यात आलेला हल्ला हा युक्रेन साठी एक मोठा धक्काच मानला जात आहे. हा पावरप्लांट युक्रेनसाठी विजेचा एक महत्त्वाचा स्त्रोत आहे. युक्रेनच्या एकूण वीज निर्मिती क्षमतेपैकी सुमारे १०% क्षमता ही या प्लांटकडूनच पूर्ण केली जाते. रशियाने केलेला हल्ल्यात हा पावर प्लांट उध्वस्त झाल्याने आणि वीजनिर्मिती ठप्प झाल्याने नजीकच्या भविष्यकाळात देशभरात विजेचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता दिसत आहे.
आधीच रशियन सैन्याने केलेल्या आक्रमक हल्ल्याशी झगडत असलेले युक्रेनचे नागरिक वीजनिर्मिती बंद झाल्याने वीज तुटवड्याच्या संकटाला कसे सामोरे जातील हे मोठे आव्हानच आहे. रशियाने मात्र हवाई हल्ल्यांमध्ये युक्रेनच्या पायाभूत सुविधांचे भरपूर नुकसान केले आहे. रशियन सैन्याने ड्रोन आणि मिसाइलचा वापर करून युक्रेनच्या पाच भागांमध्ये अनेक सोयी सुविधांना लक्ष्य केले. यात वीजनिर्मिती केंद्रांसहित काही रेल्वे लाईन आणि पुलांचेही नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.