ऑनलाइन टीम
किव्ह, दि. १८ - मलेशिया एअरलाइन्सच्या एमएच १७ या विमानाच्या अपघातामागे रशियाचा हात नसल्याचे स्पष्टीकरण रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी दिले आहे. तर युक्रेनमधील बंडखोर नेता लेक्झेंडर बोरोडई यानेही हे विमान युक्रेन सैन्याच्या क्षेपणास्त्राद्वारेच पाडण्यात आल्याचा आरोप केला आहे.
गुरुवारी मलेशियन एअरलाइन्सचे एमएच १७ हे बोईंग प्रकाराचे विमान नेदरलँड येथील अॅमस्टरडॅमहून क्वालांलापूरच्या दिशेने निघाले होते. या विमानात १५ क्रू मेंबर्ससह २९८ प्रवासी प्रवास करत होते. मात्र रशिया आणि युक्रेन सीमारेषेवर हे विमान कोसळले आहे. ज्या भागात हे विमान कोसळले तो भाग रशिया समर्थक युक्रेन बंडखोरांच्या ताब्यात आहे. त्यामुळे क्षेपणास्त्राद्वारे हे विमान पाडण्याचा आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. युक्रेनमधील सत्ताधा-यांनीही या प्रकरणात रशियाचा हात असल्याचे अप्रत्यक्षपणे सांगून आंतरराष्ट्रीय स्तरावर चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. ऑस्ट्रेलिया आणि पाश्चिमात्त्य देशांनी या हल्ल्यांमागे रशियाचा हात असल्याचा आरोप केला आहे. युक्रेनमधील बंडखोरांना रशियाने मदत केल्याचे घातक परिणाम या अपघातातून दिसून आले असे या देशांचे म्हणणे आहे.
या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी या अपघाताविषयी प्रतिक्रिया दिली. या अपघातावर शोक व्यक्त करताना पुतीन म्हणाले, या अपघाताविषयी आमची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याशीही चर्चा झाली आहे. या हल्ल्यात रशियाचा हात असल्याचे आरोप निराधार असल्याचे त्यांनी सांगितले. ज्यांच्या हद्दीत हा अपघात झाला त्यांनी याची जबाबदारी घ्यावी असेही त्यांनी युक्रेनला उद्देशून म्हटले आहे. तर दुसरीकडे युक्रेन सरकारने पुतीन यांच्या दाव्याचे खंडन करत अपघाताच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.