फिनलँडच्या नाटो सदस्यत्वा संदर्भातील वक्तव्यानंतर रशिया भडकला; म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 06:26 PM2022-05-12T18:26:31+5:302022-05-12T18:27:20+5:30
जर या दोन्ही देशांच्या सत्ताधारी सोशल डेमोक्रॅटिक पक्षांनी पुढील काही दिवसांत नाटोमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला तर नाटो थेट रशियाच्या सीमेपर्यंत पोहोचेल.
फिनलँडने कसल्याही प्रकारचा वेळ न दवडता, नाटोच्या सदस्यत्वासाठी अर्ज करायला हवा, असे फिनलँडच्या राष्ट्रपतींनी आणि पंतप्रधानांनी एका संयुक्त प्रेस रिलीजद्वारे म्हटले आहे. फिनलँडच्या या वक्तव्यानंतर, रशिया जबरदस्त भडकला आहे. एएफपी वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, फिनलँड नाटोचा सदस्य होणे, हे रशियासाठी धोक्याचे असेल, असे क्रेमलिनने म्हटले आहे. तर नाटोमध्ये फिनलँडचा प्रवेश सुरळीत आणि लवकरात लवकर होईल, असे नाटो प्रमुख स्टोल्टेनबर्ग यांनी म्हटले आहे.
रशिया अणवस्त्र तैनात करणार?
रशियाचे माजी राष्ट्रपती दिमित्री मेदवेदेव यांनी नुकताच अमेरिका आणि युरोपीय युनियनला इशारा दिला होता, की जर फिनलँड अथवा स्वीडन यांनी नाटोत सहभागी होण्याचा निर्णय घेतला, तर रशिया बाल्टिक देश आणि स्कँडिनेव्हिया शेजारी अण्विक शस्त्रास्त्रे तैनात करेल. एवढेच नाही, फिनलँड अथवा स्वीडनने असे पाऊल उचलल्यास रशियाला या भागात अण्वस्त्रे तैनात करण्याचा अधिकार असेल. एवढेच नाही, तर रशिया आपले भूदल आणि वायूदल गंभीर्याने मजबूत करेल आणि फिनलँडच्या खाडीत नैदल तैनात करेल, असेही मेदवेदेव यांनी म्हटले होते.
फिनलँड आणि स्वीडन लवकरच घेणार निर्णय -
नाटोच्या सदस्यावर फिनलँड आणि स्वीडन याच आठवड्यात मोठा निर्णय घेऊ शकतात. जर या दोन्ही देशांच्या सत्ताधारी सोशल डेमोक्रॅटिक पक्षांनी पुढील काही दिवसांत नाटोमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला तर नाटो थेट रशियाच्या सीमेपर्यंत पोहोचेल.