नवी दिल्ली: रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. यादरम्यान, रशियानेगुगलवर दिशाभूल करणाऱ्या बातम्या चालवल्याचा आरोप करत 3 हजार कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. मॉस्को न्यायालयाने गुगलला रशियाविरुद्ध बेकायदेशीर आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या चालवल्याबद्दल आणि युक्रेन युद्धाविषयी खोटी माहिती दिल्याबद्दल दोषी ठरवले आहे.
कोर्टात गुगलला यासाठीही दोषी ठरवण्यात आले की, सरकारकडून वारंवार इशारा देऊनही गुगलने यूट्यूब आणि इतर ठिकाणांहून चुकीचा मजकूर हटवला नाही. यानंतर गुगलला 21.1 अब्ज रूबल (सुमारे 3,000 कोटी रुपये) दंड ठोठावण्यात आला. नियामक रॉस्कमेंजोर म्हणाले की, टांस्की न्यायालयाने Google ला $373 दशलक्ष दंड ठोठावला आहे. वारंवार विनंती करूनही कंपनी आपल्या साइटवरून प्रतिबंधित साहित्य हटवत नाहीय. न्यायालयाने विशेषतः यूट्यूबला कडक ताकीद दिली आहे.
गुगल अकाउंट फ्रीजरशियाने Google ला अनेक वेळा असा कंटेट आपल्या साइट आणि YouTube वरून काढून टाकण्याचा इशारा दिला होता. परंतु युक्रेन युद्धादरम्यान, कंपनीने अधिक प्रक्षोभक आणि चुकीची माहिती प्रसारित केली. युट्युब रशियातील तरुणांनाही भडकवते, असे ताज्या प्रकरणात न्यायालयाला आढळून आले. न्यायालयाने रशियामधील एकूण वार्षिक उलाढालीनुसार Google वर दंडाची रक्कम निश्चित केली आहे. गेल्या वर्षी कंपनीला 7.2 अब्ज रूबलचा दंडही ठोठावण्यात आला होता. गुगलचे रशियातील खातेही जप्त करण्यात आले आहे. यासोबतच कंपनीविरोधात दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.