रशियाचा युक्रेनवर क्षेपणास्त्र वर्षाव, सहा जण ठार; मोठ्या प्रमाणात विध्वंस
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 07:09 AM2023-03-10T07:09:17+5:302023-03-10T07:12:03+5:30
गेल्या तीन आठवड्यांतील हा सर्वांत मोठा हल्ला.
किव्ह : रशियाने गुरुवारी पहाटे संपूर्ण युक्रेनमधील ऊर्जा पायाभूत सुविधांना लक्ष्य करत क्षेपणास्त्रांचा भडीमार केला. यातील काही क्षेपणास्त्रे निवासी इमारतींवर आदळल्याने सहा ठार, तर अनेकजण जखमी झाले. गेल्या तीन आठवड्यांतील हा सर्वांत मोठा
हल्ला होता, असे युक्रेनियन अधिकाऱ्यांनी सांगितले.
क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे दक्षिण युक्रेनमधील झापोरिझ्झिया अणुऊर्जा प्रकल्पाचा वीजपुरवठा खंडित झाला. हा प्रकल्प रशियाच्या ताब्यात आहे. रशियाच्या ताब्यात गेल्यापासून हा प्रकल्प अंधारात बुडण्याची ही सहावी वेळ आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने या प्रकल्पाला १८ डिझेल जनरेटरवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. हे जनरेटर दहा दिवस प्रकल्प चालवू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली. शीतकरण यंत्रणा सुरू न राहिल्यास प्रकल्प वितळण्याचा धोका उद्भवू शकतो. शीतकरण यंत्रणेसाठी सतत ऊर्जेची आवश्यकता असते, असेही सूत्रांनी सांगितले.
राजधानीवर क्षेपणास्त्रांसह स्फोटक ड्रोनद्वारेही हल्ला करण्यात आला. यातील अनेक क्षेपणास्त्रे रोखण्यात आली. पण या हल्ल्याचा ऊर्जेच्या पायाभूत सुविधांना फटका बसला, असे किव्हच्या शहर प्रशासनाने सांगितले.
लविव्ह प्रांतात तीन इमारती नष्ट
एक क्षेपणास्त्र लविव्ह प्रांतातील निवासी भागावर आदळल्याने पाचजण ठार झाले, असे लविव्हचे राज्यपाल मॅक्सिम कोझित्स्की यांनी सांगितले. तीन इमारती आगीमुळे नष्ट झाल्या असून, बचाव कर्मचारी ढिगारे उपसून मृतदेहांचा शोध घेत आहेत, असेही ते म्हणाले.
गुटेरेस यांच्या दौऱ्यानंतर काही तासांनी हल्ले
युक्रेनला धान्य पाठविण्याची परवानगी देणारा व रशियाला अन्न, खते निर्यात करण्यास परवानगी देणारा करार वाढविण्याबाबत राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी किव्हला भेट दिल्याच्या काही तासांनंतर हे हल्ले झाले आहेत.