कीव्ह : रशियन सैन्याने रात्रभर युक्रेनवर ड्रोन व क्षेपणास्त्र हल्ला केला. यात युक्रेनचे दुसरे सर्वांत मोठे शहर खार्किव येथे सहा लोक ठार तर ११ हून अधिक जखमी झाले, अशी माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली. रशियाकडून शहरावरील करण्यात आलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांत परिसराती निवासी इमारती, एक गॅस स्टेशन, एक बालवाडी, एक कॅफे, एक दुकान व कारचे नुकसान झाले, असे खार्किव प्रदेशाचे गव्हर्नर ओलेह सिनेहुबोव्ह यांनी सांगितले.
रशियाने रात्रभर युक्रेनवर इराणी बनावटीचे ३२ शाहेद ड्रोन आणि सहा क्षेपणास्त्रांचा मारा केला, असे हवाई दलाच्या कमांडरने सांगितले. युक्रेनच्या हवाई दलाने तीन क्रूझ क्षेपणास्त्रे व २८ ड्रोन पाडले, असे लेफ्टनंट जनरल मायकोला ओलेशचुक यांनी सांगितले. “रशियन मारेकरी युक्रेनियन लोकांवर दहशत माजवत आहेत. खार्किव आणि इतर शांत शहरांवर हल्ले करीत आहेत,” असे ते म्हणाले. या हल्ल्यामुळे परिसरातील नागरिकांची तारांबळ उडाली आहे. जीव वाचवण्यासाठी नागरिक सुरक्षित स्थळी आसरा घेताना दिसत आहेत.
सैन्यांमध्ये घनघोर लढाईरशियन सैन्याने हल्ल्यांवर भाष्य केलेले नाही; परंतु, युक्रेनने शनिवारी सकाळी रशियावर व्हॅम्पायर रॉकेटचा मारा केल्याचे सांगितले. हे सर्वच्या सर्व १० रॉकेट हवाई संरक्षण यंत्रणेने रशियाच्या सीमावर्ती प्रदेश बेल्गोरोडवर पाडले, असे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले. दरम्यान, रशिया आणि युक्रेनच्या सैन्यात अनेक ठिकाणी घनघोर लढाई सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.