कीव्ह : गेल्या २४ दिवसांपासून रशियन फौजांचे हल्ले झेलणाऱ्या युक्रेनवर आज रशियाने सर्वात खतरनाक हायपरसोनिक मिसाईल डागल्याने खळबळ उडाली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा संयम आता सुटत चालला असून पुढे ते अणुबॉम्बही टाकायला मागे पुढे पाहणार नाहीत, अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.
रशियानेच हायपरसोनिक मिसाइल डागल्याचा दावा केला आहे. किंझल हायपरसोनिक मिसाईल वापरून आम्ही युक्रेनच्या मिसाईल आणि विमानांच्या शस्त्रांचे मोठे भांडार उद्ध्वस्त केल्याचा दावा केला आहे. हा हल्ला रशियाचा पाचवा जनरल युक्रेनमध्ये मारला गेल्यानंतर करण्यात आला आहे. यामुळे अमेरिकेने रशिया अण्वस्त्रांचा वापर करणार असल्याचा इशारा दिला आहे.
रशियाचे पाचवे जनरल एंद्रेई मोरदविचेव हे युक्रेनमध्ये मारले गेले आहेत. पुतीन यांचे सैन्य नवीन अणुबॉम्बवर काम करत आहे, असा अणुबॉम्ब जो युरोपचेसंरक्षण कवच भेदू शकेल, असा दावा अमेरिकेने केला आहे. या अणुबॉम्बद्वारे पुतीन पश्चिमी देशांना भयंकर नुकसान करू शकतात असेही अमेरिकेने म्हटले आहे.
क्रेनची राजधानी कीववर आण्विक हल्ल्याचा धोका वाढू शकतो, असे अमेरिकेच्या संरक्षण गुप्तचर संस्थेचे संचालक लेफ्टनंट जनरल स्कॉट बॅरियर यांनी सांगितले. रशियन सैन्य सातत्याने कीववर हल्ले करत आहे पण त्याला अद्याप यश आलेले नाही. ते म्हणाले की, हताश झालेले पुतीन संपूर्ण जगासाठी धोका बनू शकतात. ते म्हणाले की, रशियाचा दावा आहे की ते पाश्चात्य देशांच्या हवाई संरक्षण यंत्रणेला चकमा देण्यास सक्षम क्षेपणास्त्रे बनवत आहेत. यामुळे पाश्चिमात्य देशांचे मोठे नुकसान होऊ शकते.