रशियाने युक्रेनचे एस-२०० क्षेपणास्त्र हवेतच रोखले; २० ड्रोनचा हल्लाही हाणून पाडला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 09:22 AM2023-08-14T09:22:58+5:302023-08-14T09:24:03+5:30
युक्रेनने क्रिमियाला लक्ष्य करून केलेला २० ड्रोनचा हल्लाही हाणून पाडण्यात आला आहे.
मॉस्को : गेल्या दीड वर्षापासून रशिया व युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध अद्याप थांबलेले नाही. युक्रेनने शनिवारी मॉस्कोला जोडणाऱ्या क्रिमिया पुलावर एस-२०० क्षेपणास्त्राद्वारे हल्ला केला. मात्र, रशियाच्या हवाई संरक्षण यंत्रणेने हे क्षेपणास्त्र हवेतच नष्ट केले, अशी माहिती रशियन संरक्षण मंत्रालयाने दिली.
युक्रेनने शनिवारी क्रिमियाला लक्ष्य करून केलेला २० ड्रोनचा हल्लाही हाणून पाडण्यात आला आहे. युक्रेनचे २० पैकी १४ ड्रोन पाडण्यात आले, तर उर्वरित सहा जप्त करण्यात आले आहेत. मॉस्कोच्या वेळेनुसार दुपारी एकच्या सुमारास हा हल्ला करण्यात आला होता. (वृत्तसंस्था)