रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा(Russia Ukraine Crisis) आज दुसरा दिवस आहे. युद्धात आतापर्यंत शेकडो लोकांचा मृत्यू झाला असून, युक्रेनच्या पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रशियन सैन्य राजधानी कीवमध्ये दाखल झाले आहे. यातच आता युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की(Ukraine President Volodymyr Zelenskyy) यांनी सैन्य बंकरमध्ये आश्रय घेतल्याची माहिती मिळत आहे.
गेल्या दोन दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. यात दोन्ही देशाचे मोठे नुकसान झाले आहे. परंतु, आता ही युद्धजन्य परिस्थिती निवळण्याची शक्यता आहे. कारण रशिया युक्रेनसोबत चर्चेसाठी तयार झाला आहे. त्यासाठी रशिया आपले एक शिष्टमंडळ चर्चेसाठी युक्रेनला पाठवणार आहे. हे शिष्टमंडळ युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्सकी यांच्यासोबत चर्चा करणार आहे.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनशी चर्चा करण्यास सहमती दर्शवली आहे. चीनने याबाबतची माहिती दिली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, 'राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी पुतीन यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे. पुतिन म्हणाले की, ते युक्रेनसोबत उच्चस्तरीय चर्चेसाठी तयार आहेत. याआधी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी पुतीन यांना चर्चेचा प्रस्ताव पाठवला होता, त्यावर त्यांनी चर्चेची तयारी दर्शवली आहे.
युक्रेनच्या अनेक शहरांवर रशियाचा ताबा-
युक्रेनच्या प्रमुख शहरांवर रशियन सैन्याने ताबा मिळवला आहे. रशियन आक्रमणामुळे संपूर्ण देशात भीतीचे वातावरण आहे. यातच रशियाने युक्रेनधील चेर्नोबिल अणु उर्जा प्रकल्पावर आधीच कब्जा केला आहे. दरम्यान, कीवपासून साधारणपणे 60 किलोमीटर अंतरावर वायव्येकडे असलेल्या इव्हान्कीव्ह येथे नदीवरील एक पूल शुक्रवारी सकाळच्या सुमारास नष्ट झाला आहे. पुतिन यांच्याविरोधात रशियातच ठिकठिकाणी आंदोलन-
रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा खुद्द रशियातच विरोध होताना दिसत आहे. या हल्ल्याविरोधात रशियाच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये लोक आंदोलन करत आहेत. राजधानीसह 53 शहरांत लोक रस्त्यावर उतरले आहेत. आंदोलन करणाऱ्या 1700 लोकांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले आहे.