Russia Ukraine War Updates: रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाला अडीच वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. युक्रेनच्या लष्कराने रशियाच्या पश्चिम सीमेत घुसखोरी करून कुर्स्क प्रांतातील सुमारे एक हजार किलोमीटरचा परिसर ताब्यात घेतला आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, रशियन सैन्याने युक्रेनच्या सैनिकांना बाहेर काढण्यासाठी आपली कारवाई अधिक आक्रमक केली आहे. गेल्या २४ तासांत युक्रेनचे ३७० सैनिक मारले गेल्याचा दावा रशियाच्या संरक्षणमंत्र्यांनी केला आहे. तसेच आतापर्यंत, कुर्स्कमध्ये १५,३०० युक्रेनियन सैनिक मारले गेल्याचाही दावा करण्यात आला आहे.
रशियन संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, युक्रेनच्या सैन्याने कुर्स्क भागात तीन ठिकाणांहून घुसण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर रशियन सैन्याने प्रत्युत्तराची कारवाई तीव्र केली. रशियन सैन्याच्या म्हणण्यानुसार, नाटोचा पुरवठा कुर्स्कमधील युक्रेनियन सैन्यापर्यंत पोहोचू शकला नाही. दुसरीकडे, रशिया युक्रेनच्या पूर्व सीमेवर सातत्याने आपली प्रगती वाढवत आहे आणि खार्किवला लागून असलेल्या एकामागून एक शहरे ताब्यात घेत आहेत.
रशियन सैन्याचे कुर्स्कमध्ये आक्रमण
युक्रेनच्या हल्ल्यानंतर रशिया आणखी आक्रमक झाला आहे. रशिया युक्रेनच्या शहरांवर सातत्याने हल्ले करत आहे. रिपोर्ट्सनुसार, रशियन सैन्याने कुर्स्कमध्ये आतापर्यंत हजारो युक्रेनियन सैनिकांना ठार केले आहे आणि ते कुर्स्कला युक्रेनच्या तावडीतून सोडवण्यासाठी सतत कार्यरत आहेत. युक्रेन सातत्याने रशियावर ड्रोनने हल्ले करत आहे, मात्र बहुतांश ड्रोन हल्ले रशियाच्या हवाई संरक्षणाने हाणून पाडले आहेत. काही ड्रोन मॉस्को ऑइल रिफायनरी आणि कोनाकोवो पॉवर स्टेशनवर पडले आहेत. त्यानंतर तेथे आग लागल्याच्या अनेक बातम्या आल्या आहेत.
रशियाचा युक्रेनच्या 'नाटो' सहभागाला विरोध का?
दरम्यान, रशियाचे म्हणणे आहे की ते युक्रेनला नाटोमध्ये सामील होण्यापासून रोखू इच्छित आहेत. NATO ही २९ युरोपीय देश आणि दोन उत्तर अमेरिकन देशांमधील लष्करी युती आहे. मित्रपक्षांमध्ये शांतता आणि सुरक्षा राखण्यासाठी ते एकमेकांना मदत करतात. युक्रेन नाटो गटात सामील होण्याचा प्रयत्न करत आहे, पण रशियाचा त्याला विरोध आहे. कारण युक्रेन हा रशिया आणि पश्चिमेकडील विभागाचा महत्त्वाचा बफर झोन आहे.