रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ड्रोन, मिसाईलचा वर्षाव, अनेक प्रमुख शहरांमध्ये स्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 01:20 PM2024-08-26T13:20:10+5:302024-08-26T13:26:01+5:30
Russia attacks Ukraine Kyiv: युक्रेनची राजधानी कीव यासह डस्सा, विनितसिया, झापोरिझिया, क्रेमेनचुक, डनिप्रो, ख्मेलनित्स्की, क्रोपिव्हनित्स्की, क्रिवी रिह या शहरांवरही झाले हल्ले
Russia attacks Ukraine Kyiv: रशियन सैन्याने युक्रेनवर मोठा हवाई हल्ला केला. सोमवारी सकाळी रशियाने युक्रेनवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ला केला. युक्रेनियन न्यूज पोर्टल द कीव इंडिपेंडंटने आपल्या वृत्तात म्हटले आहे की २६ ऑगस्टला सकाळी राजधानी कीव आणि युक्रेनच्या इतर शहरांमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले. रशियाकडून मोठ्या प्रमाणावर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांच्या आधारे हे स्फोट घडवून आणण्यात आले. त्यामुळे सकाळीच देशभरात हवाई हल्ले झाले. कीव व्यतिरिक्त, जवळच्या शहरांमध्ये देखील जोरदार हल्ले झाले.
अहवालात दावा करण्यात आला आहे की, सकाळी साडे आठ वाजता शहरात स्फोट ऐकले आणि काही मिनिटांनंतर आणखी अनेक स्फोट ऐकू आले. खार्किवमध्येही स्फोट ऐकू आले, असे शहराचे मेयर इहोर तेरेखोव्ह यांनी सांगितले. कीव व्यतिरिक्त, डस्सा, विनितसिया, झापोरिझिया, क्रेमेनचुक, डनिप्रो, ख्मेलनित्स्की, क्रोपिव्हनित्स्की, क्रिवी रिह येथेही हल्ले झाल्याची माहिती आहे.
युक्रेनियन हवाई दलाने ११ रशियन बॉम्बर तसेच रशियन कामिकाझे ड्रोनची सूचना दिली होती. यानंतर हवाई दलाने अनेक क्षेपणास्त्रे डागणार असल्याचे सांगितले. मात्र, नंतर युक्रेनच्या हवाई दलाने रशियन बॉम्बरची संख्या ११ नसून सहा असल्याचे सांगितले. युक्रेनने म्हटले आहे की, रशियन सैन्याने मोठ्या प्रमाणावर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागून त्यांच्या विभागाला लक्ष्य केले आहे. हे युद्ध फेब्रुवारी २०२२ पासून सुरू आहे. पण अलीकडच्या काळात ते युद्ध अधिक भीषण होत चालले आहे. युक्रेनने अलीकडेच रशियाचा मोठा प्रदेश ताब्यात घेतला होता. तसेच युक्रेनच्या लष्कराने अलीकडेच रशियातील साराटोव्ह शहरातील सर्वात मोठ्या इमारतीवर ड्रोनने हल्ला करून मोठे नुकसान केले होते. युक्रेनने रशियाच्या साराटोव्ह भागातील दोन प्रमुख शहरांवर ड्रोन हल्ले केले. यानंतर रशिया पलटवार करेल असे मानले जात होते. त्यानंतर अपेक्षेप्रमाणे रशियाने युक्रेनवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली.