रशियाने युक्रेनच्या दोन शहरांवर केला क्षेपणास्त्र हल्ला, एका मुलासह ४ जण ठार, ४२ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 07:59 AM2023-06-28T07:59:36+5:302023-06-28T08:34:32+5:30
Russia-Ukraine War: गेल्या वर्षी २७ जून २०२२ रोजी क्रेमेनचुकवर रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात एका शॉपिंग मॉलमध्ये 22 लोकांचा मृत्यू झाला होता.
किव : रशियाने मंगळवारी युक्रेनमधील क्रेमेनचुक आणि क्रामाटोर्स्क या दोन शहरांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. क्रामाटोर्स्क मध्यभागी असलेल्या सर्वात व्यस्त ठिकाणी क्षेपणास्त्र हल्ल्यात एका मुलासह एकूण चार लोक ठार झाले, तर ४२ हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
एका स्थानिक अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. वृत्तसंस्था एएफपीने पोलिसांच्या हवाल्याने सांगितले की, रशियाने क्रामाटोर्स्क शहरावर पृष्ठभागावरून हवेत मारा करणारी दोन एस-३०० क्षेपणास्त्रे डागली. युक्रेनच्या आपत्कालीन सेवेने टेलिग्रामवर या हल्ल्यात ४२ जण जखमी झाल्याची माहिती दिली.
डोनेट्स्क प्रदेशाच्या लष्करी प्रशासनाचे प्रमुख पावलो किरिलेन्को यांनी सांगितले की, रशियाचा युक्रेनवर हल्ला मंगळवारी स्थानिक वेळेनुसार साडेसात वाजता झाला. आम्ही जखमी आणि मृतांची संख्या जाणून घेत आहोत, असेही ते म्हणाले. ज्या ठिकाणी हल्ला झाला ते ठिकाण शहराच्या मध्यभागी असून येथे नागरिकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
युक्रेनियन अधिकार्यांचा हवाला देत सीएनएनने वृत्त दिले आहे की, रशियाने क्रेमेनचुकमधील एका गावात दुसरा हल्ला केला. मात्र, यादरम्यान क्षेपणास्त्र गावाबाहेर पडले. याचबरोबर, युक्रेनचे गृहमंत्री इहोर क्लिमेंको यांनी टेलिग्रामवर सांगितले की, रशिया जाणीवपूर्वक लोकसंख्या असलेल्या भागांना लक्ष्य करत आहे. दरम्यान, गेल्या वर्षी २७ जून २०२२ रोजी क्रेमेनचुकवर रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात एका शॉपिंग मॉलमध्ये 22 लोकांचा मृत्यू झाला होता.