Russia vs Ukraine, World War III: युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरू असलेले युद्ध लांबतच चालले आहे. गेल्या काही दिवसांपासून रशिया आक्रमक भूमिका घेत युक्रेनवर सातत्याने हल्ले करत आहे. रशियन हल्ल्यांदरम्यान युक्रेन नाटो (नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन) मध्ये सामील होण्याचा प्रयत्न करत आहे. अशा स्थितीत युक्रेन 'नाटो'मध्ये सामील झाल्याबद्दल रशियाने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. युक्रेन रशियाबद्दल अपप्रचार करत असल्याचा दावा राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी केला असून, रशियाने यावेळी थेट तिसऱ्या महायुद्धाची धमकी दिली आहे.
रशियाने यापूर्वीही अनेकदा अण्वस्त्रांच्या वापराबाबत वक्तव्ये केली आहेत, तेव्हापासून तिसरे महायुद्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावेळी रशियाने तिसऱ्या महायुद्धाची धमकी देऊन गंभीर व तणावाची परिस्थिती निर्माण केली आहे. दोन देशांमध्ये युद्ध सुरू झाल्यापासून रशियाकडून तिसऱ्या महायुद्धाचा थेट इशारा होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
रशियन सुरक्षा परिषदेचे उपसचिव अलेक्झांडर वेनेडिक्टोव्ह म्हणाले की, युक्रेनला माहित आहे की जर ते 'नाटो'मध्ये सामील झाले तर ते या युद्धाचे रूपांतर तिसऱ्या महायुद्धात करतील. पुतीन यांच्या निकटवर्तीय मानल्या जाणारे अलेक्झांडर वेनेडिक्टोव्ह म्हणाले की, नाटो सदस्यांनाही असे पाऊल उचलण्याचे दुष्परिणाम माहिती आहेत. रशियाकडून हा इशारा अशा वेळी देण्यात आला आहे, जेव्हा रशिया युक्रेनच्या अनेक भागात सातत्याने हल्ले करत आहे.
तिसर्या महायुद्धावर फ्रेंच राष्ट्राध्यक्षांचे विधान- फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनीही रशियाच्या तिसऱ्या महायुद्धाच्या धमकीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. आम्हाला महायुद्ध नको आहे, असे मॅक्रॉन यांनी म्हटले आहे. मॅक्रॉन म्हणाले की, आम्ही युक्रेनचे सार्वभौमत्व वाचवण्यासाठी मदत करत आहोत, मात्र रशियावर कधीही हल्ला करणार नाही. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी आता हे युद्ध थांबवले पाहिजे. त्यांनी युक्रेनच्या प्रादेशिक अखंडतेचा आदर केला पाहिजे.