रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे मोठी उलथापालथ होताना दिसत आहे. देश एकमेकांसोबतची दुष्मनी-मैत्री विसरून दुसऱ्या गटात सहभागी होऊ लागले आहेत. भारताविरोधात गरळ ओकून अमेरिका, चीनकडून फायदा उकळणारा पाकिस्तान आता अमेरिकेपासून दूर होताना दिसत आहे. तर दुसरीकडे भारताचा जिगरी दोस्त रशियापाकिस्तानच्या बाजुने मैदानात उतरला आहे.
पाकिस्तानच्या अंतर्गत विषयांमध्ये कथित अमेरिकी हस्तक्षेपावर रशियाने संताप व्यक्त केला आहे. अमेरिकेला रशियाने बेशरम म्हटले आहे. तसेच अमेरिकेचा आदेश न मानल्याने इम्रान खानला शिक्षा देण्याचा कट रचत असल्याचा आरोप केला आहे. यापूर्वी तुर्की आणि इराणने अमेरिकेला इशारा दिला होता. आता तर रशिया यात उतरला आहे.
रशियाचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्त्या मारिया जाखरोवा यांनी म्हटले की, आम्ही पाकिस्तानची संसद भंग करण्याच्या घडामोडींवर जवळून लक्ष ठेवून आहोत. इम्रान खान यांनी २३-२४ तारखेला जसे मॉस्कोमध्ये पाऊल ठेवले तसे अमेरिकेसह त्यांच्या पश्चिमी देशांनी त्यांच्यावर दबाव आणण्यास सुरुवात केली. वॉशिंग्टनवरून पाकिस्तानातील अमेरिकी राजदुताचा फोन खणाणला. इम्रान खाननी रशियाचा दौरा रद्द करून मागे परतावे अशी त्यांची मागणी होती. परंतू पाकिस्तानने ते फेटाळले.
अमेरिका इम्रान खानला आज्ञा न पाळण्याची शिक्षा देऊ इच्छित आहे यात शंका नाही. विरोधकांच्या अविश्वास ठरावावेळी खुद्द इम्रान खान यांच्या पक्षाच्या खासदारांनीही पारडे बदलले. स्वतःच्या फायद्यासाठी अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणात ढवळाढवळ करण्याचा हा निर्लज्ज प्रयत्न आहे, असा आरोप त्यांनी अमेरिकेवर केला आहे.