रशियाचा युक्रेनमध्ये आणखी फौजा वाढविण्याचा डाव
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 05:51 AM2022-03-31T05:51:54+5:302022-03-31T05:52:40+5:30
या युद्धाच्या ३५व्या दिवशी रशियाच्या सैनिकांनी कीव्ह व परिसरातील हल्ले काहीसे कमी केले.
कीव्ह/वॉशिंग्टन : कीव्ह परिसरातून रशिया सैन्य माघारी बोलावत नसून ते सैन्यसंख्या वाढवत असल्याचा व युक्रेनच्या दुसऱ्या भागांवर जोरदार हल्ले चढविण्याची तयारी करत असल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. आमच्या लष्कराचेे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी रशियाच्या सध्या निराळ्या हालचाली सुरू असल्याचा आरोप युक्रेनने केला आहे.
या युद्धाच्या ३५व्या दिवशी रशियाच्या सैनिकांनी कीव्ह व परिसरातील हल्ले काहीसे कमी केले. तसेच आपले सैन्य आणखी मागे नेले. त्यामुळे रशिया सैन्य माघारी नेण्याच्या विचारात असल्याची चर्चा सुरू झाली. मात्र युक्रेन व अमेरिकेने ही शक्यता फेटाळून लावली आहे. युक्रेनच्या दक्षिण व उत्तर भागामध्ये आणखी जोरदार हल्ले चढविण्याची रशियाची योजना असून, त्यामुळे नव्या रणनीतीनुसार कीव्ह परिसरातील सैन्य काहीसे मागे घेण्यात आल्याचा युक्रेनचा दावा आहे. (वृत्तसंस्था)
चर्चा करणारे प्रतिनिधी मायदेशी परतले
युक्रेन व रशियाच्या प्रतिनिधींमध्ये तुर्कस्थान येथे चर्चा सुरू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी हे प्रतिनिधी मायदेशात परतले आहेत. तुर्कस्थानमधील चर्चेत जी बोलणी झाली त्याबाबत आपल्या वरिष्ठांशी ते अधिक चर्चा करणार आहेत. त्यानंतरच दोन्ही देश पुढचे पाऊल काय उचलायचे याचा निर्णय घेतील, असे तुर्कस्थानने म्हटले आहे.
अमेरिकी सरकारचे सल्लागार भारतात...
n युक्रेनवर आक्रमण केल्यामुळे रशियावर अमेरिकेने आर्थिक निर्बंध लादले. त्या निर्णयाची रूपरेषा आखणारे अमेरिकी सरकारचे सल्लागार व मूळ भारतीय वंशाचे असलेले दलिप सिंह हे बुधवारपासून भारताच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत.
n युक्रेनचे युद्ध तसेच हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रातील आर्थिक सहकार्य या विषयावर त्यांनी केंद्र सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
n गुरुवारीदेखील ही चर्चा सुरू राहाणार आहे. रशियाचे परराष्ट्रमंत्री सेर्गेई लावरोव हे उद्या, गुरुवारी भारताच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत. त्याआधीच दलिप सिंह भारतात दाखल झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.