Russia Putin on Population Crisis: भारत देश वाढत्या लोकसंख्येमुळे त्रस्त असताना जगात असे अनेक देश आहेत जे घटत्या जन्मदरामुळे त्रस्त आहेत. अनेक देशांत लोकसंख्या वाढवण्यासाठी विविध धोरणे आखली जात आहेत. क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश असलेल्या रशियाला घटत्या जन्मदराचा सामना करावा लागत आहे. परिस्थिती अशा टप्प्यावर पोहोचली आहे की रशियन सरकार या समस्येला तोंड देण्यासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याचा विचार करत आहे.
मिररच्या रिपोर्टनुसार, रशिया देशातील घटत्या जन्मदराला तोंड देण्यासाठी 'मिनिस्ट्री ऑफ सेक्स' तयार करण्याचा विचार करत आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या रशियन संसदेच्या कौटुंबिक संरक्षण, पितृत्व, मातृत्व आणि बाल्य समितीच्या अध्यक्षा नीना ओस्टानिना यांनी अशा मंत्रालयाची मागणी करणाऱ्या याचिकेचे पुनरावलोकन केले आहे.
युद्धानंतर लोकसंख्या कमी
युक्रेनमधील युद्धामुळे देशाची लोकसंख्या कमी होऊ लागली. लोकसंख्या वाढीचा घटता दर रोखण्यासाठी पुतीन यांनी लोकसंख्या वाढवण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी रशियन अधिकारी अनेक धोरणांचा अवलंब करत आहेत. पण अपेक्षित परिणाम दिसत नसल्याने सरकारच्या वतीने आता हा नवा पुढाकार घेण्यात आला आहे. जवळपास तीन वर्षांपासून सुरू असलेल्या या युद्धात रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांची मोठी जीवितहानी झाली आहे. त्यामुळे रशियाचे सरकार लोकसंख्या वाढीवर अधिक भर देत आहे.