मॉस्को - रशियानं ८ महिन्यापूर्वीच बांगलादेशात सत्तापालट होणार अशी भविष्यवाणी केली होती. त्यावेळी रशियानं केलेल्या आरोपाला फारसं कुणी गांभीर्याने घेतले नाही. परंतु आज रशियानं केलेला दावा बांगलादेशच्या स्थितीकडे पाहिल्यास खरा ठरतोय. बांगलादेश अस्थिर करण्याची योजना अमेरिका करत आहे असा आरोप रशियाच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते मारिया जखारोवा यांनी केला होता. अरब स्प्रिंगच्या धर्तीवर बांगलादेशाला अमेरिका अस्थिर करत आहे. बांगलादेशात जानेवारी २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी अमेरिकेच्या इशाऱ्यावर हिंसा पसरवण्याचा प्रयत्न झाला होता मात्र शेख हसीना सरकार बनवण्यात यशस्वी ठरल्या असंही रशियानं म्हटलं होते.
रशियाच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते मारिया जखारोवा यांनी जानेवारीत बांगलादेश निवडणुकीपूर्वी म्हटलं होतं की, जर लोकांचा कौल अमेरिकेसाठी समाधानकारक नसेल तर ते 'अरब स्प्रिंग'च्या धर्तीवर बांगलादेशातील परिस्थिती आणखी अस्थिर करण्याचा प्रयत्न करू शकते. अरब स्प्रिंग किंवा पहिला अरब स्प्रिंग ही सरकारविरोधी निदर्शने आणि सशस्त्र उठावांची मालिका होती जी २०१० च्या दशकाच्या सुरुवातीस अरब जगतात पसरली होती. भ्रष्टाचार आणि आर्थिक स्तब्धतेला प्रतिसाद म्हणून ट्युनिशियामध्ये याची सुरुवात झाली.
डिसेंबरमध्येही झाली होती बांगलादेशात हिंसा
१२-१३ डिसेंबर २०२३ रोजी बांगलादेशात निवडणुकीपूर्वी अनेक भागात तत्कालीन सरकारविरोधात लोक रस्त्यावर उतरले होते. बसेस जाळल्या होत्या. पोलिसांसोबत संघर्ष झाला होता. या घटनांचा आणि ढाकामधील पाश्चात्य राजनैतिक मिशनच्या प्रक्षोभक कारवायांचा आम्हाला थेट संबंध दिसतो. विशेषतः,अमेरिकन राजदूत पी हास, ज्यांच्याशी आम्ही आधीच २२ नोव्हेंबरच्या ब्रीफिंगमध्ये चर्चा केली होती. ते म्हणाले होते येत्या आठवड्यात बांगलादेश सरकारवर प्रतिबंधांसह व्यापक दबाव वापरला जाण्याची शक्यता आहे असंही रशियाच्या प्रवक्त्यांनी सांगितले होते.
दरम्यान, बांगलादेशातील प्रमुख उद्योगांवर हल्ला होऊ शकतो. अमेरिका बांगलादेशच्या अनेक अधिकाऱ्यांना विना पुरावा ७ जानेवारी २०२४ सार्वत्रिक निवडणुकीत नागरिकांच्या लोकशाही इच्छेला अडथळा आणल्याचा आरोप केला जाऊ शकतो. परंतु आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, बाह्य शक्तींच्या सर्व कारस्थानांना न जुमानता, बांगलादेशातील सत्तेचा मुद्दा शेवटी या देशातील जनताच ठरवेल, इतर कोणी नाही असं रशियाने ८ महिन्यापूर्वीच म्हटलं होते.