रशिया युक्रेनचा खेरासन प्रांत बुडविण्याच्य़ा तयारीत; डॅममध्ये लँडमाईन्स पेरले...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2022 11:23 AM2022-10-21T11:23:08+5:302022-10-21T11:45:31+5:30
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्की यांनी रशियन सैन्याने आखलेला धक्कादायक प्लॅन सांगितला आहे. खेरासनमध्ये तातडीने आंतरराष्ट्रीय निरीक्षकांना पाठविण्याची मागणी त्यांनी केली आहे.
रशिया आणि युक्रेनमधील युद्ध काही थांबण्याचे नाव घेत नाहीय. आज आठ महिने होत आले तरी युक्रेन अवघ्या अडीज लाख सैनिकांच्या आणि नागरिकांच्या जोरावर बलाढ्या रशियन फौजांशी लढत आहे. दोन्ही बाजुंनी प्रचंड नुकसान झाले आहे. अब्जावधी डॉलरचा खर्च झाला आहे. तरीही युक्रेन नमत नसल्याने पुतीन सेनेने आता युक्रेनमध्ये कहर मांडण्याचे ठरविले आहे.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्की यांनी रशियन सैन्याने आखलेला धक्कादायक प्लॅन सांगितला आहे. खेरासनमध्ये तातडीने आंतरराष्ट्रीय निरीक्षकांना पाठविण्याची मागणी त्यांनी केली आहे. दक्षिणी युक्रेनच्या खेरासन भागात एका मोठ्या डॅममध्ये रशियने सैन्याने बॉम्ब पेरले आहेत. Kakhovka Hydroelectric Power Plant असे या डॅमचे नाव असून तो सध्या रशियन फौजांच्या ताब्यात आहे.
या डॅमचा वापर युक्रेनमध्ये वीज तयार करण्यासाठी केला जातो. हा डॅम Dnieper River वर बनविण्यात आला आहे. या डॅमचे पाणी नॉर्थ क्रीमिया नदीला जाऊन मिळते. हे धरण दक्षिण युक्रेनच्या नागरी भागांना पाणीपुरवठा करते. स्फोट झाला तर सर्व पाणी वाहून जाईल आणि दक्षिण युक्रेनमध्ये पाणीपुरवठा देखील ठप्प होईल.
युक्रेनच्या आरोपांनुसार हा डॅम केवळ वीज निर्मितीसाठीच महत्वाचा नाहीय, तर रशियाच्या रणनितीसाठी देखील महत्वाचा आहे. हा डॅम फोडला तर त्याचे पाणी खेरासनमध्ये घुसून प्रचंड विध्वंस करू शकते. यामुळे रशियाच्या सैन्याने या डॅमला स्फोटके लावली आहेत. याचे पाणी शहरे, गावांत घुसून पूराची स्थिती निर्माण होईल. जवळपास ८० टक्के भाग पाण्याखाली जाईल, असा आरोप झेलेन्स्की यांनी केला आहे. धरण फोडले तर सर्वात मोठे आव्हान अणुऊर्जा प्रकल्प थंड करण्याचे असेल. अशा परिस्थितीत झापोरिझिया न्यूक्लियर पॉवर प्लांटमध्ये थंड होण्यासाठी पाणी शिल्लक राहणार नाही, असा इशाराही झेलेन्स्की यांनी दिला आहे.