Russia Ukraine War: रशिया फायनल मुव्हच्या तयारीत? भारतीयांनी तातडीने युक्रेन सोडावे; मोदी सरकारचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2022 07:40 AM2022-10-26T07:40:37+5:302022-10-26T07:41:04+5:30
फेब्रुवारीमध्ये युद्ध सुरू झाले तेव्हादेखील भारतीय दूतावासाने आपल्या नागरिकांना तातडीने युक्रेन सोडण्याचे आवाहन केले होते. असे असूनही मोठ्या संख्येने लोक युक्रेनमध्येच राहिले आणि भारत सरकारला त्यांना बाहेर काढण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता.
युक्रेनवर पुतीन सेना अण्वस्त्र हल्ला करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. असे असताना भारत सरकारचे आदेश सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. युक्रेनमधील भारतीय दुतावासाने मंगळवारी तेथे राहणाऱ्या भारतीयांसाठी महत्वाच्या सूचना केल्या आहेत. युक्रेनमध्ये जिथे कुठे राहत असाल, तेथून तातडीने निघून जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
युक्रेनमध्ये परिस्थिती बिघडत चालली आहे. यामुळे आता तिथए भारतीयानी वास्तव्य करू नये, असे आदेश गेल्याच आठवड्यात देण्यात आले होते. आता पुन्हा एकदा भारतीयांनी तातडीने युक्रेन सोडावे असे आदेश देण्यात आले आहेत. सध्या युक्रेनमधून बाहेर पडण्य़ासाठी विमाने, जहाजे उपलब्ध आहेत. त्याचा वापर करून युक्रेन सोडावे असे या आदेशात म्हटले आहे.
दूतावासाने सांगितले की, पूर्वीच्या सल्ल्यानुसार काही भारतीय नागरिकांनी युक्रेन सोडले आहे. नागरिकांनी युक्रेनच्या सीमेवर प्रवास करण्यासाठी, कोणत्याही मार्गदर्शनासाठी किंवा मदतीसाठी संपर्क साधावा. फेब्रुवारीमध्ये युद्ध सुरू झाले तेव्हादेखील भारतीय दूतावासाने आपल्या नागरिकांना तातडीने युक्रेन सोडण्याचे आवाहन केले होते. असे असूनही मोठ्या संख्येने लोक युक्रेनमध्येच राहिले आणि भारत सरकारला त्यांना बाहेर काढण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी रशियाने काही तासांसाठी युद्ध देखील थांबविले होते.
तेव्हा दोन्ही देशांमधील युद्धादरम्यान एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला होता, तर दुसरा गंभीर जखमी झाला होता. मृत हा कर्नाटकातील विद्यार्थी असून तो खारकीवमध्ये गोळीबारात जखमी झाला होता. रशियन सैन्याने केलेल्या गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप युक्रेनने केला होता, तर रशियाने हे आरोप फेटाळून लावले होते.