Vladimir Putin Call To PM Modi: गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू झालेले युद्ध अद्यापही सुरूच आहे. कोणताही देश माघार घेताना दिसत नाही. जगभरातील अनेक देशांनी युद्ध थांबण्यासाठी प्रयत्न केले आहेत. मात्र, त्याचा सकारात्मक परिणाम झाल्याचे पाहायला मिळत नाही. यातच आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी फोनवरून संवाद साधला. यावेळी युक्रेनविरुद्धचे युद्ध अद्याप का थांबलेले नाही, याचे कारण सांगितले, अशी माहिती देण्यात आली आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर चर्चा केली. यादरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये युक्रेन युद्धासह प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा झाली. शांतता, सुव्यवस्था राखण्यासाठी आणि स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी रशियाच्या नेतृत्वाखाली उचललेल्या पावलांना पंतप्रधान मोदींनी पाठिंबा दिला. या संवादादरम्यान पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना रशियातील सद्यस्थिती आणि ताज्या घडामोडींची माहिती दिली.
...म्हणून युक्रेनविरुद्धचे युद्ध अद्याप सुरूच
दोन्ही नेत्यांमधील संभाषणादरम्यान, पंतप्रधान मोदींनी २४ जून रोजी रशियामध्ये वॅग्नर आर्मीच्या विद्रोह आणि सत्तापालटाच्या प्रयत्नासंदर्भात राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे समर्थन केले. दोन्ही जागतिक नेत्यांनी विविध क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी द्विपक्षीय सहकार्याच्या मुद्द्यावर भर दिला. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन आणि जी-२० वरही चर्चा झाली. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना युक्रेन युद्धाच्या सद्यस्थितीची माहिती दिली. युक्रेन युद्ध थांबण्यासाठी कोणत्याही प्रकारची राजकीय आणि राजनैतिक पावले उचलण्यास नकार देत असल्याचे त्यांनी सांगितले. पुतिन आणि मोदी यांनी भारत-रशिया संबंधांना पुढील स्तरावर नेण्यासाठी आणि त्यांची धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यासाठी सतत संपर्कात राहण्यासाठी वचनबद्ध केले.
दरम्यान, आमचे मित्र भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मेक इन इंडिया'ची संकल्पना सुरू केली होती. याचे सकारात्मक परिणाम भारताला मिळाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मेक इन इंडिया' संकल्पनेचा भारतीय अर्थव्यवस्थेवर 'स्पष्ट परिणाम' झाला आहे, या शब्दांत पुतिन यांनी मेक इन इंडिया संकल्पना आणि पंतप्रधान मोदी यांचे कौतुक केले आहे.