Vladimir Putin China Visit: रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध अद्याप पूर्णपणे शमलेले नाही. तशातच आता इस्रायल आणि हमास यांच्यात नवं युद्ध सुरू झालं आहे. या युद्धात तब्बल १६०० लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. याच दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिनचीन दौऱ्यावर जाणार आहेत. जगातील दोन बलवान नेते एकमेकांची भेट घेणार असताना त्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. रशियाचे पुतिन चीन दौऱ्यावर जाण्याचे नक्की कारण तरी काय, असा सवाल आता केला जात आहे. जाणून घेऊया या दौऱ्यामागे कारण नक्की काय आहे.
बेल्ट अँड रोड इन्फ्रास्ट्रक्चर (बीआरआय) प्रकल्पाला एक दशक पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात पुतीन चीनमध्ये जाऊन कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या दौऱ्यामध्ये अनेक देशांचे नेते सहभागी होणार आहेत. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानेही याला दुजोरा दिला आहे. या अंतर्गत चीन सरकार बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हच्या भागीदारांसोबत पुढील टप्प्यावर चर्चा करण्यासाठी आणि विकासाचे नवे आयाम निर्माण करण्यासाठी बीजिंगमध्ये येणाऱ्या शिष्टमंडळाचे स्वागत करत असल्याचे सांगण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी 130 हून अधिक देशांच्या प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले आहे. युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर पुतिन यांचा हा पहिलाच चीन दौरा आहे. मॉस्को मीडियाच्या वृत्तानुसार, त्यांच्यासोबत रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव देखील असतील, जे चीनी समकक्ष वांग यी यांच्याशी चर्चा करतील. बीजिंगच्या नेतृत्वाने या उपक्रमाचे कौतुक केले आणि सांगितले की, एक्सपोर्ट-इम्पोर्ट बँक ऑफ चायना (एक्झिमबँक) च्या प्रकल्पांसाठी कर्जाची शिल्लक आता एकूण 2.2 ट्रिलियन युआन ($307.4 अब्ज) आहे. युक्रेनसोबतच्या युद्धात रशियाचा दीर्घकाळ सहभाग असल्यामुळे शस्त्रास्त्रांचा तुटवडा आहे. चीन आणि रशिया हे पारंपारिकपणे मैत्रीपूर्ण देश आहेत, त्यामुळे संपूर्ण जग त्याच्या भेटीवर लक्ष ठेवून आहे.