Russia : “...हल्ले हा रशियाचाच डाव,” पुतिन यांच्या हत्येच्या प्रयत्नांच्या आरोपाचं युक्रेनकडून खंडन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2023 10:12 PM2023-05-03T22:12:36+5:302023-05-03T22:13:52+5:30
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले 'महायुद्ध' थांबण्याचं नाव घेत नाहीये.
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले 'महायुद्ध' थांबण्याचं नाव घेत नाहीये. दरम्यान, रशियानं युक्रेनवर राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप केला होता. युक्रेननं पुतिन यांना मारण्यासाठी क्रेमलिनवर ड्रोननं हल्ला केला. मात्र या हल्ल्यात पुतिन यांना कोणतीही इजा झालेली नाही. ते पूर्णपणे सुरक्षित असल्याचं रशियानं म्हटलं होतं. दरम्यान, या प्रकरणावर आता युक्रेनकडूनही स्पष्टीकरण देण्यात आलं असून या ड्रोन हल्ल्याशी आमचं कोणतंही घेणंदेणं नाही असं त्यांनी म्हटलंय.
“क्रेमलिनवर कोणी कथितरित्या हल्ला केला या घटनेची आम्हाला माहिती नाही. आम्ही आमच्या देशाचं संरक्षण करत आहोत. दुसऱ्यांवर हल्ल्याचा आमचा कोणताही हेतू नाही. आमचं याच्याशी कोणतंही देणं-घेणं नाही. रशिया केवळ युक्रेनला नष्ट करण्याचं निमित्त शोधत आहे,” अशी प्रतिक्रिया युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलादिमीर झेलेन्स्की यांचे प्रवक्ते मिखाइलो पोडोलियाक यांनी दिली.
युक्रेनने कथित हल्ल्यांना रशियाचाच डाव असल्याचं म्हटलं आहे. "रशियाच्या अशा बनावट रिपोर्टला युक्रेनवर मोठ्या प्रमाणावर दहशतवादी हल्ल्याची पार्श्वभूमी तयार करण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले पाहिजे,” असंही युक्रेननं म्हटलंय.
हल्ल्यानंतर पुतिन बंकरमधून काम करतील
क्रेमलिन मीडियानुसार, या हल्ल्यानंतर पुतिन नोवो-ओगारेवो येथील त्यांच्या निवासस्थानी बांधलेल्या बंकरमधून काम करतील. रशिया युक्रेनच्या ड्रोन हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याची तयारी करत असल्याचं म्हटलं जात आहे. या ड्रोन हल्ल्यानंतरही रशियात ९ मे रोजी होणारी परेड पुढे ढकलली जाणार नाही. त्याच वेळी, मॉस्कोच्या महापौरांनी ड्रोनच्या उड्डाणावर बंदी घातली आहे.