Russia: पुतीन यांची कुटील खेळी, युद्ध जिंकण्यापूर्वीच युक्रेनचा मोठा भूभाग रशियाच्या ताब्यात येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 01:17 PM2022-09-28T13:17:54+5:302022-09-28T13:18:26+5:30
Russia Ukraine: युक्रेनविरुद्धच्या युद्धामुळे व्लादिमीर पुतीन रशिया आणि रशियाबाहेर टीकेचे धनी झाले होते. मात्र पुतीन माघार घेण्यास तयार नाही आहेत. त्यामुळेच त्यांनी एक कुटील खेळी खेळून युक्रेनचा मोठा भूभाग युद्ध जिंकण्यापूर्वीच रशियाच्या ताब्यात आणण्याची योजना अंतिम टप्प्यात आणली आहे.
मॉस्को - युक्रेनविरुद्धच्या युद्धामुळे व्लादिमीर पुतीन रशिया आणि रशियाबाहेर टीकेचे धनी झाले होते. मात्र पुतीन माघार घेण्यास तयार नाही आहेत. त्यामुळेच त्यांनी एक कुटील खेळी खेळून युक्रेनचा मोठा भूभाग युद्ध जिंकण्यापूर्वीच रशियाच्या ताब्यात आणण्याची योजना अंतिम टप्प्यात आणली आहे. पुतीन यांनी युद्धात ताब्यात घेतलेल्या युक्रेनच्या भागांना रशियात विलीन करण्यासाठी सार्वमत घेतले आहे. या सार्वमताचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. त्यामधून रशियाने ताब्यात घेतलेल्या भागातील लोक युक्रेनमध्ये राहू इच्छितात की रशियात विलीन होण्यास मान्यता देतात याचा निकाल लागणार आहे.
या सार्वमताचा निकाल व्लादिमीर पुतीन हे ३० सप्टेंबर रोजी जाहीर करण्याची शक्यता आहे. ज्या भागात हे सार्वमत घेण्यात आले त्यामध्ये लुहान्स्क, अंशत: ताब्यात आलेल्या जापोरिज्जिया आणि डोनेत्स्क भागांचा समावेश आहे. सुमारे ४० लाख लोकांना या सार्वमतामध्ये भाग घेण्यास सांगण्यात आले होते.
मिळत असेल्या माहितीनुसार रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन शुक्रवारी रशियाच्या संसदेला संबोधित करताना सार्वमताचा निकाल जाहीर करून हे भाग रशियात विलीन करण्याची घोषणा करू शकतात. या भागांचे क्षेत्रफळ हे युक्रेनच्या एकूण क्षेत्रफळापैकी १५ टक्के आहे. मात्र या निर्णयामुळे युद्ध अधिक भयावह स्थितीत पोहोचू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या सार्वमतामध्ये लोकांना घाबरवून धमक्या देऊन मतदान करण्यास भाग पाडल्याचे सांगण्यात येत आहे. रशियाचे सैनिक हत्यारांसह येतात. आमच्या संरक्षणासाठी काय करावं, हे आम्हाला सूचत नाही. दरम्यान, जे लोक रशियाच्याविरोधात मतदान करत आहेत. त्यांना वेचून वेचून ठार मारलं जात आहे. जिथे हे सार्वमत घेण्यात आले. तेथील लोक घाबरलेले आहेत. ज्यांनी युक्रेनच्या बाजूने मतदान केलं आहे. त्यांच्यासोबत काय होईल, या भीतीनी हे लोक घाबरले आहेत.