कीव्ह: रशियाच्या लष्कराने युक्रेनची राजधानी कीव्हसहित सात शहरांवर गुरुवारी १२० क्षेपणास्त्रांचा मारा केला. या हल्ल्यांमध्ये १४ वर्षांच्या एका मुलीसह तीन जण जखमी झाले, तर अनेक इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे. क्षेपणास्त्रांच्या माऱ्यात काही जण मरण पावल्याची किंवा जखमींची संख्या अधिक असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र त्याबाबतचा अधिक तपशील अद्याप उपलब्ध होऊ शकला नाही.
याआधी १५ नोव्हेंबरला रशियाने युक्रेनवर १०० क्षेपणास्त्रे डागली होती. त्यातील दोन क्षेपणास्त्रे पोलंडच्या हद्दीत पडली होती. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांचे सल्लागार माईखाइलो पोडोलियाक यांनी सांगितले की, रशियाने युक्रेनमधील निवासी भागांवर क्षेपणास्त्रांचा मारा केला आहे. कीव्ह, ल्वीव, खारकिव, माइकोलिव, ओडेसा, पोल्टावा, जिटोमिर या सात शहरांवर रशियाने गुरुवारी हल्ले केले. यामुळे युक्रेनच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
रशियाची नवी चाल
युक्रेनवर हल्ला करताना रशियाने नवी चाल खेळली आहे. रशियाचे लष्कर हल्ल्याच्या सुरुवातीला इराणी ड्रोन पाठवते. सेल्फ एक्स्प्लोड होणारी ही ड्रोन पाडल्यानंतर युक्रेनचे सैनिक थोडे निर्धास्त होतात. त्यानंतर मग रशियाचे लष्कर क्रूझ क्षेपणास्त्रांनी जोरदार मारा करते. रशियाला ड्रोनचा पुरवठा करू नका, असा इशारा अमेरिकेने इराकला दिला आहे.
सुरू झाले ‘तेलयुद्ध’
- तेलाच्या मुद्द्यावरून आता रशियाचा युरोपीय देशांशी संघर्ष होण्याची शक्यता आहे. युरोपीय देशांना इंधन तेल व नैसर्गिक वायूचा पुरवठा बंद करण्याचा निर्णय रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी घेतला आहे. - हा आदेश एक फेब्रुवारीपासून अंमलात येणार असून आहे. युरोपीय देश सध्या ऊर्जा संकटाशी झुंजत आहेत. रशियाने इंधन, नैसर्गिक वायूचा पुरवठा बंद केला तर परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"