रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान इतर देशांनी घातलेले निर्बंध हा सर्वात मोठा मुद्दा ठरताना दिसत आहे. अमेरिकेपासून ब्रिटनपर्यंत अनेक देशांनी रशियाविरोधात कठोर कारवाई केली आहे. आता त्या कारवाईवर रशियानं पलटवार केल्याचं पाहायला मिळत आहे. रशियाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन, हिलरी क्लिंटन यांच्यासह अनेक अमेरिकन अधिकाऱ्यांवर अनेक निर्बंध लादले आहेत. नेमके कोणत्या प्रकारचे निर्बंध येणार आहेत याबद्दल फारशी माहिती अद्याप समोर आलेली नाही.
जेव्हापासून राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनविरुद्ध युद्ध पुकारले आहे, तेव्हापासून अमेरिकेपासून युरोपियन युनियनच्या देशांपर्यंत सर्वांनी रशियन अर्थव्यवस्थेला जबरदस्त धक्का दिला आहे. विविध निर्बंध लादले गेले आहेत. हवाई क्षेत्र बंद करण्याचा निर्णय असो किंवा रशियातून येणारी तेलाची आयात थांबवणे असो. या कारवाईमुळे रशियन अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला असून, मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनीही पुतिन यांच्यामुळे रशियाची अर्थव्यवस्था डबघाईला आली असून ते स्वतः एकाकी पडल्याचे म्हटले होते.
रशियानेही या निर्बंधांना प्रत्युत्तर देत अमेरिकेवर निर्बंध लादले आहेत. रशियाकडून थेट राष्ट्राध्यक्ष बायडन यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. अमेरिकेने या कारवाईवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अमेरिकेनं आतापर्यंत अनेकदा रशियाला इशारा देखील दिला आहे. त्याचे गंभीर परिणाम होणार असल्याचीही चर्चा आहे, पण रशिया काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही असं दिसून आलं आहे. यावेळी रशिया बदला घेण्यावर अधिक भर देत आहे. या कारणास्तव, युक्रेनबरोबरचे हे युद्ध देखील 20 दिवसांवर ताणले गेले आहे. दोन्ही देशांमध्ये अनेकदा वाटाघाटी देखील झाल्या आहेत. पण प्रत्यक्षात त्याला काही फारसे यश आलेले नाही.