लोकमत न्यूज नेटवर्क : रशिया आणि युक्रेन यांच्यात तूर्त तरी पारंपरिक युद्ध सुरू आहे. जागतिक स्तरावरून अंकुश असल्याने रशियाने अजून अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा वापर केलेला नाही. रशियाकडे सर्व प्रकारची शस्त्रे असल्याने जगालाही चिंता लागून राहिली आहे. त्यातच युद्ध चिघळले तर रशियाने रासायनिक अस्त्रांचा वापर करू नये यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर जाणून घेऊ या रासायनिक अस्त्रांविषयी...
सगळ्यात घातक रासायनिक अस्त्रे कोणती?
ब्लिस्टरिंग एजंट : रासायनिक अस्त्रांमध्ये सर्वाधिक वापर या अस्त्राचा होतो. यातील सल्फर मस्टर्ड, नायट्रोजन मस्टर्ड, लेविसाइट आणि फॉस्जिन ऑक्सिम हे वायू शरीरात त्वचेद्वारे प्रवेश करतात. या अस्त्रामुळे डोळे, श्वसनयंत्रणा आणि फुफ्फुस यांच्यावर परिणाम होतो. शरीरावर व्रण निर्माण होतात. अंधत्व येण्याची शक्यता असते.
नर्व्ह एजंट : हे वायुरूपात असतात. या रासायनिक वायूंनी सर्वात विनाशकारी अस्त्रांची निर्मिती होते. शरीराच्या मज्जासंस्थेवरच हे वायू हल्ला करतात. या प्रकारच्या रासायनिक अस्त्रांत अत्यंत विषारी वायूंचा वापर केलेला असतो. नर्व्ह एजंट द्रवरूपातून, हवेतून, वाफेतून तसेच धुलिकणांच्या माध्यमातून पसरवता येतात.
ब्लड एजंट : या प्रकारचे रासायनिक अस्त्रातील रसायने रक्तपेशींवर हल्ला करतात. प्राणवायूला प्रवेश ही रसायने नाकारतात. व्यक्तीचा श्वास गुदमरू लागतो. यात हायड्रोजन सायनाइड, सायनोजेन क्लोराइड आणि आर्सिन या वायूंचा समावेश असतो. हवेतून या अस्त्राचा हल्ला करता येऊ शकतो.
चोकिंग एजंट : यात असलेल्या विषारी वायूंमुळे श्वसनमार्गात त्रास सुरू होतो. नाक, घसा आणि फुफ्फुसांत जळजळ होते. फुफ्फुसांच्या माध्यमातून हा वायू शरीरात प्रवेशतो. श्वास गुदमरू लागतो. फुफ्फुसांमध्ये पाणी जमा होते. या प्रकारच्या रासायनिक अस्त्रात क्लोरिन, क्लोरोपिक्रिन, डिफोसजीन आणि फॉस्जिन यांसारखे वायू असतात. हवेतून हा वायू सोडता येतो.