रशियाने घेतला बदला; युक्रेनवर डागली ८३ क्षेपणास्त्रे, १० ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 06:33 AM2022-10-11T06:33:30+5:302022-10-11T06:33:45+5:30
अनेक शहरांवर हल्ले; क्रिमिया पुलावरील स्फोटाला प्रत्युत्तर
कीव्ह : रशिया व क्रिमियाला जोडणाऱ्या पुलावर झालेला भीषण ट्रक बॉम्बस्फोट युक्रेनने घडविला, असा दावा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी केला. या बॉम्बस्फोटाला प्रत्युत्तर देण्यासाठीच रशियाने सोमवारी युक्रेनवर क्षेपणास्त्र हल्ले केल्याचे त्यांनी जाहीर केले. युक्रेनमधील कीव्हसहित नऊ शहरांवर रशियाने ८३ क्षेपणास्त्रे डागली असून, त्या भीषण हल्ल्यांमध्ये १२ ठार व ६० जण जखमी झाले आहेत.
युक्रेनने रशियाच्या सुरक्षेला धोका पोहोचविणारे आणखी हल्ले केले, तर त्यांना चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा पुतीन यांनी सोमवारी दिला. युक्रेनमधील कीव्ह, लविव, तेर्नोपिल, झापोरिझिया, दनिप्रो, खारकीव आदी नऊ शहरांवर रशियाने क्षेपणास्त्र हल्ले चढविले आहेत. या शहरांमध्ये झालेल्या जीवितहानीची माहिती अद्याप उपलब्ध झाली नाही.
कीव्ह राष्ट्रीय विद्यापीठाच्या जवळ एका क्षेपणास्त्रामुळे मोठा स्फोट झाला. दनिप्रो शहरामध्ये क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे जीवितहानीही झाली. रशियाने सोमवारी युक्रेनच्या विविध शहरांतील जल व विद्युत पुरवठा केंद्रांनाही लक्ष्य केले.
युक्रेनवर रशियाने सोमवारी दहशतवादी हल्ले केल्याचा आरोप युक्रेनचे परराष्ट्रमंत्री दिमित्रो कुलेबा केला आहे. (वृत्तसंस्था)
युक्रेनला संपविण्याचा रशियाचा डाव
युक्रेन देशाचे अस्तित्व संपविण्याचा रशियाचा डाव आहे. रशियाने कितीही प्रयत्न केले तरी युक्रेन आपल्या अधिकारांसाठी यापुढेही संघर्ष करत राहणार आहे.
- वोलोदिमीर जेलेन्स्की, राष्ट्राध्यक्ष, युक्रेन