मॉस्को: रशियातील घनदाट जंगलात हरवलेली दोन वर्षाची चिमुकली ३ दिवसांनंतर सुखरुप परतली आहे. हिंस्र अस्वल आणि इतर प्राण्यांचा वावर असलेल्या जंगलातून २२ महिन्यांची ल्युडा कुजिना सुरक्षित परतली. त्यामुळे तिच्या पालकांना आश्चर्याला सुखद धक्का बसला. ल्युडा खेळता खेळता घनदाट जंगलात हरवली. तिच्या शोधासाठी प्रयत्नांची शर्थ करण्यात आली. ३ दिवसांपासून तिचा शोध सुरू होता. ल्युडा सुखरुप परतेल ही आशा कुटुंबीयांनी सोडली होती. मात्र ३ दिवसांनंतर ल्युडा जंगलातून परतली.
द सननं दिलेल्या वृत्तानुसार, ल्युडा कुजिना स्लोलेंक्समधील ओबनिंस्क येथे असलेल्या एका बागेत खेळत होती. तिथून ती अचानक बेपत्ता झाली. पालकांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ल्युडा सापडली नाही. बचाव दलाचे ५०० सदस्य जंगलात ल्युडाचा शोध घेत होते. मात्र त्यांच्या हातीदेखील अपयश आलं. त्यामुळे ल्युडाच्या कुटुंबावर आभाळ कोसळलं.
ल्युडा ज्या जंगलात हरवली, त्या जंगलात अनेक हिंस्र प्राणी आहेत. या जंगलात लांडग्यांची आणि अस्वलांची संख्या मोठी आहे. त्यामुळे ल्युडाच्या जीवाला धोका होता. मात्र ३ दिवस शोध घेऊनही ती न सापडल्यानं बचाव दलानं आशा सोडली होती. मात्र अचानक बचाव दलातील कर्मचाऱ्यांना लहान मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. बचाव दल आवाजाच्या दिशेनं गेल्यावर त्यांना एका झाडाखाली ल्युडा उभी असलेली दिसली.
काही किटकांनी ल्युडाचा चावा घेतला होता. त्यामुळे ती बरीच कमजोर झाली होती. मात्र सुदैवानं कोणत्याही हिंस्र प्राण्यानं तिच्यावर हल्ला केला नाही. दोन रात्री आणि तीन दिवस ती जंगलात एकटीच होती. या जंगलात दिवसाढवळ्या जायलादेखील लोक घाबरतात, त्याच जंगलातून ल्युडा ३ दिवसांनंतर सुखरुप परतली.