युक्रेनवर (Ukraine) चढाई केल्यापासून रशिया (Russia) अमेरिका (US) आणि पश्चिमेकडील देशांच्या निशाण्यावर आहे. रशियाविरुद्ध एकानंतर एक अनेक आर्थिक निर्बंध (Economic Sanctions) लावण्यात आले आहेत. अमेरिकेने नुकतेच रशियन तेल आणि गॅसवरही नर्बंध (Sanction On Russian Oil&Gas) लादण्याचा निर्णय घेतला आहे.
युक्रेनवरील हल्ल्यानंतर 100 हून अधिक अमेरिकन आणि इतर बहुराष्ट्रीय कंपन्यांनी रशियातील आपला व्यवसाय गुंडाळला आहे. यात बोईंग आणि एअरबस सारख्या विमान निर्मिती क्षेत्रातील कंपन्यांपासून ते फेसबुक (Facebook) आणि गुगल (Google) सारख्या टेक कंपन्यांचाही समावेश आहे. मात्र, आता रशिया याचा सामना करण्याची आणि पलटवार करण्याची तयारी करत आहे. यासाठी रशियातील ज्या कंपन्यांनी आपला व्यवसाय बंद केला आहे, त्यांचे कारखाने आणि इतर मालमत्तांचे राष्ट्रीयीकरण करण्याची तयारी सुरू केली आहे.
पुतिन यांच्या पक्षाने केलंय भाष्य - राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) यांच्या 'यूनाइटेड रशिया पार्टी (United Russia Party)'चे जनरल काउंसिलचे सेक्रेटरी आंद्रेइ तुर्चक (Andrei Turchak) यांनी दोन दिवसांपूर्वीच यावर भाष्य केले आहे. ते म्हणाले, युक्रेनवरील हल्ल्यानंतर, पश्चिमेकडील ज्या कंपन्या रशिया सोडून जात आहेत, त्यांच्या संपूर्ण ऑपरेशनचे राष्ट्रीयीकरण करणे आवश्यक आहे. असे केल्यास लोकांच्या नोकऱ्याही वाचतील आणि रशिया देशातच सामान बनविण्यातही सक्षम राहील.
या कंपन्यांचे घेतले नाव -पक्षाच्या वेबसाइटवर पोस्ट केलेल्या एका निवेदनात, हे पाऊल टोकाचे असल्याचेही तुर्चक यांनी मान्य केले आहे. ते म्हणाले, 'हे टोकाचे पाऊल आहे, मात्र, आमच्या पाठीत कुणी सुरा भोकत असेल, तर आम्ही तेही सहन करू शकत नाही. आम्हाला आमच्या लोकांचे संरक्षण करावे लागेल. खरे तर हे एक प्रत्यक्ष युद्ध आहे. तसेच हे युद्ध केवळ रशिया विरोधात नाही, तर संपूर्ण रशिय नागरिकांच्या विरोधात आहे. आम्ही युद्धकाळातील कायद्यांनुसार, कठोर पलटवार करू.' एवढेच नाही, तर तुर्चक यांनी आपल्या निवेदनात काही कंपन्यांच्या नावाचाही उल्लेख केला आहे. यात Valio, Paulig आणि Fazer सारख्या फिनिश फूड कंपन्यांच्या नावाचाही समावेश आहे.