रशिया आणि युक्रेन यांच्यात भीषण युद्ध सुरू आहे. आज युद्धाचा १४वा दिवस आहे. या युद्धात आतापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. रशियाने हे युद्ध पुकारल्यापासून जगातील अनेक देशांनी त्यांच्यावर विविध प्रकारचे निर्बंध लादले आहेत. एवढेच नाही, तर अनेक मोठ-मोठ्या कंपन्याही आता रशिया विरोधात थेट अॅक्शन घेताना दिसत आहेत. मात्र त्यानंतरही रशियाकडून युक्रेनवर हल्ला करण्यात येत आहे.
युक्रेनची राजधानी कीव्ह येथे रशियन सैन्याकडून मोठ्या हल्ल्याचा अलर्ट देण्यात आला आहे. रशियाचा मोठा फौजफाटा कोणत्याही क्षणी कीव्हमध्ये धडकण्याची शक्यता असल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात आला आहे. कीव्ह शहराच्या उत्तर आणि उत्तर-पश्चिम भागातही रशियन सैन्य सज्ज आहे. आता पू्र्वेकडूनही रशियन सैन्य येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचपार्श्वभूमीवर बुधवारी सकाळी किव्ह आणि आसपासच्या परिसरात एअर अलर्ट घोषित करण्यात आला. रहिवाशांना शक्य तितक्या लवकर बंकरमध्ये आश्रय घेण्याचे आवाहन करण्यात आले.
सद्यस्थितीत, रशिया आणि युक्रेन दोहोंपैकी कुणीही माघार घ्यायला तयार नाही आणि हल्ल्यांची मालिकाही सुरूच आहे. सुमीमध्ये रशियाने ५०० किलोचा बॉम्ब टाकल्याचा दावाही युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी केला आहे. मारियुपोलमध्येही एका मुलाचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. अशा स्थितीत दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होताना दिसत आहे.
दरम्यान, आतापर्यंत अनेक देशांनी रशियावर विविध प्रकारचे निर्बंध लादले आहेत, तर मोठ्या कंपन्याही रशियाच्या विरोधात आणि युक्रेनच्या समर्थनार्थ पावले उचलताना दिसत आहेत. यामध्ये, आता मॅकडोनाल्ड्सने (McDonalds) रशियामधील सर्व ८५० रेस्टॉरंट तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. रशियातील ८४ टक्के रेस्टॉरंट मॅकडोनाल्डकडे आहेत. गेल्या वर्षी कंपनीच्या महसुलात रशिया आणि युक्रेनचा वाटा ९ टक्के असल्याचे कंपनीने म्हटले.
रशियाच्या समर्थनात समोर आला चीन -
रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू असताना, सध्या अनेक देश न्यूट्रल आहेत. मात्र, यातच चीनचे राष्ट्रपती जिनपिंग यांनी रशियाचे उघडपणे समर्थन केले आहे. जग रशियावर जे निर्बंध लादत आहे, त्यामुळे सर्वांचेच नुकसान होणार आहे, असे जिनपिंग यांनी म्हटले आहे. याच बरोबर, चर्चेतून समाधान काढावे, असेही त्यांनी म्हटले आहे.