Putin Chechen Forces Russia Ukrain War : रशियाला मोठा धक्का देत युक्रेनने राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्या हत्येसाठी पाठवलेल्या बर्बर चेचन स्पेशल फोर्सच्या मोठ्या तुकडीचा खात्मा केल्याची माहिती समोर आली आहे. डेली मेलने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. हा चेचन सशस्त्र गट त्याच्या क्रूर हिंसाचार आणि मानवी हक्कांच्या उल्लंघनासाठी कुप्रसिद्ध आहे. कीवच्या ईशान्येकडील हॉस्टोमेलजवळ त्याच्या ५६ रणगाड्यांचा ताफा युक्रेनियन क्षेपणास्त्राने उडवला असल्याचंही यात सांगण्यात आलंय.
यामध्ये या गटातील किती सैनिक मारले गेले याची माहिती समोर आलेली नाही. परंतु ही संख्या शेकडोंमध्ये असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. युक्रेनच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात ज्या लोकांचा मृत्यू झाला त्यात चेचेन जनरल मॅगोमेद तुशेव यांचंही नाव असल्याचं डेली मेलच्या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलंय.
पुतिन यांच्यासाठी मोठा झटकारिपोर्टनुसार, तुशैवना फोटोंमध्ये कोदिरोव सोबत दाखवण्यात आलं होतं जे चेचेन सरकारसाठी त्यांचं महत्त्व दर्शवतं. कादिरोव समलिंगी पुरुषांचा छळ करून त्यांना मारण्यासाठी कुख्यात आहे. कादिरोव्हने त्याच्या कथित मृत्यूच्या आदल्या दिवशी युक्रेनियन जंगलात त्याच्या स्क्वाड्रनला भेट दिली होती असं म्हटलं जातं. युक्रेनच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात हे लोक मारले जाणे हा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या युक्रेन जिंकण्याच्या योजनेला मोठा धक्का असल्याचंही म्हटलं जातंय.
झेलेन्स्कींना हत्येचा प्लॅनडेली मेलने वृत्त दिलेल्या वृत्तानुसार रशियन राष्ट्राध्यक्षांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांना पकडण्यासाठी किंवा मारण्यासाठी एक गट पाठवला होता. युक्रेनच्या रक्षणासाठी जीव देण्याचे ठरवलेल्या युक्रेनियन लोकांच्या मनात यामुळे प्रचंड भीती निर्माण होईल याची त्यांना चांगली जाणीव होती. चेचन लढवय्ये 'हंटर्स' म्हणून ओळखले जातात. युक्रेनच्या ज्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि सुरक्षा अधिकाऱ्यांना मारण्याचा प्लॅन करण्यात आला आहे त्यांचे फोटो या टीममधील प्रत्येक सैनिकाला देण्यात आले असल्याचा दावाही एका अहवालात करण्यात आलाय.