वॉशिंग्टन : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना लवकरच सत्ता सोडावी लागेल. त्यांच्यासारखा माणूस सत्तास्थानी असणे योग्य नाही, असे उद्गार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पोलंडच्या दौऱ्यात काढले. त्यावर पुतीन यांनी काय करायचे हे ठरविणारे तुम्ही कोण, असा संतप्त सवाल रशियाने अमेरिकेला विचारला आहे. त्यावर रशियात सत्ताबदल करण्याची अमेरिकेची कोणतीही योजना नाही, अशी सारवासारव बायडेन सरकारने केली आहे. जो बायडेन यांनी म्हटले होते की, पुतिन यांनी युक्रेनमध्ये नरसंहार चालविला आहे. ते युद्ध गुन्हेगार आहेत. कोणत्याही कारणाविना रशियाने युक्रेनवर आक्रमण केले असून, त्यामध्ये हजारो नागरिक मारले जात आहेत. युक्रेनचे यु्द्ध रशियाने तातडीने थांबवावे. रशियाचे सामान्य नागरिक हे काही अमेरिकेचे शत्रू नाहीत, असेही ते म्हणाले होते. पुतीन यांच्याबाबतच्या बायडेन यांच्या वक्तव्यांवर रशियाने म्हटले आहे की, पुतिन यांनी सत्तापदी राहावे की न राहावे, हा सर्वस्वी रशियाचा प्रश्न आहे. पुतिन यांना सल्ला देण्याचा बायडेन यांना काय अधिकार आहे, असाही जाब रशियाने विचारला आहे.
रशियन सैनिकांकडून लष्करी अधिकाऱ्याची हत्या?रशियाचे लेफ्टनंट जनरल याकोव रेझानत्सेव यांना त्या देशाच्या सैनिकांनीच ठार मारले असल्याचा दावा पाश्चिमात्य देशांनी केला आहे. युक्रेनवर आक्रमण करूनही अपेक्षित विजय मिळत नसल्याने, निराश झालेल्या रशियन सैनिकांनी हे कृत्य केल्याचे सांगण्यात येत आहे. या युद्धात रशियाच्या लष्कराचे सात वरिष्ठ अधिकारी ठार झाल्याचा युक्रेन लष्कराने केला आहे. युक्रेनवर रशिया काही तासांत विजय मिळवेल, असा दावा युद्ध सुरू झाल्यानंतर याकोव रेझानत्सेव यांनी केला होता.
युक्रेनविरोधात सुरू केलेले युद्ध हा रशियाचा धोरणात्मक पराभव आहे, अशी टीका अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केली. ते म्हणाले की, रशियाने युक्रेनविरोधात सुरू केलेले युद्ध लगेचच संपेल, अशी चिन्हे नाहीत.