ड्रोन हल्ल्यात गंभीर जखमी झाला सैनिक, सहकाऱ्याला म्हणाला, डोक्यात गोळी मार, त्यानंतर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2024 14:01 IST2024-06-23T14:00:06+5:302024-06-23T14:01:25+5:30
Russia Ukrain War: रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाबाबतचे अनेक भयावह व्हिडीओ सातत्याने समोर येत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ड्रोन हल्ल्यात गंभीर जखमी झालेला एक सैनिक सहकाऱ्याला आपल्या डोक्यात गोळी झाडण्याची सूचना करताना दिसत आहेत.

ड्रोन हल्ल्यात गंभीर जखमी झाला सैनिक, सहकाऱ्याला म्हणाला, डोक्यात गोळी मार, त्यानंतर...
रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सव्वा दोन वर्षांचा काळ लोटला तरी अद्याप सुरू आहे. तसेच दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाल्यानंतरही युद्धाला कुठलंही निर्णायक वळण मिळालेलं नाही. दरम्यान, दोन्ही देशांमधील या युद्धाबाबतचे अनेक भयावह व्हिडीओ सातत्याने समोर येत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ड्रोन हल्ल्यात गंभीर जखमी झालेला एक सैनिक सहकाऱ्याला आपल्या डोक्यात गोळी झाडण्याची सूचना करताना दिसत आहेत.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तीन रशियन सैनिक मैदानी भागातून जाताना दिसत आहेत. त्याचवेळी एक ड्रोन येऊन त्यामधील सैनिकावर आदळून स्फोट होतो. तसेच त्यात या तिघांपैकी एक सैनिक गंभीर जखमी होतो. जखमी अवस्थेत विव्हळत पडलेला हा सैनिक मागून येणाऱ्या एका सहकारी सैनिकाला आपल्या डोक्यात गोळी झाडण्याची सूचना इशाऱ्यांमधून देतो. त्यानंतर मागू येणारा सैनिक त्या जखमी सैनिकाच्या डोक्यावर नेम धरून गोळी झाडताना या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.
युद्धाच्या मैदानात गंभीर जखमी झाल्यानंतर कुठलीही मदत मिळण्याची शक्यता नसताना शत्रूच्या हाती लागू नये म्हणून तसेच शत्रूकडून होणाऱ्या छळापासून वाचण्यासाठी सैनिक अशा प्रकारचं पाऊल उचलतात. दरम्यान, युक्रेनकडून रशियन सैनिकांना लक्ष्य करून अशा प्रकारचे ड्रोन हल्ले करण्यात येत आहेत. युक्रेनने या हल्ल्यांचं एफपीव्ही ड्रोन अॅटॅक असं नामकरण केलं आहे. या हल्ल्यांमधून सैनिक, रणगाडे आणि चिलखती वाहनांना लक्ष्य करण्यात येतं.
मागच्या सव्वा दोन वर्षांपासून सुरू असलेल्या रशिया आणि युक्रेनमधील युद्धात आतापर्यंत दोन्हीकडील हजारो सैनिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच प्रचंड मोठी वित्तहानीही झालेली आहे. सद्यस्थिती हे युद्ध अनिर्णितावस्थेत आहे. मात्र कुणीही माघार घेण्याच्या तयारीत नसल्याने युद्ध सातत्याने लांबत चाललं आहे.