रशिया आणि युक्रेन युद्धाच्या घडामोडींबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. सरकारमधील टॉप सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रशिया आणि युक्रेनमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांच्याशी फोनवरुन चर्चा केली आहे. मोदी आणि जेलेन्स्की यांच्यात जवळपास ३५ मिनिटं फोनवर संवाद झाला. आज सकाळी ११.३० मिनिटांनी मोदींनी जेलेन्स्की यांनी फोन केला. त्यानंतर दोघांमध्ये सद्य परिस्थितीवर चर्चा झाली.
युद्ध विरामासाठी रशिया आणि युक्रेनकडून चर्चा केली जात असल्याच्या मुद्द्याचं पंतप्रधान मोदींनी कौतुक केल्याचं बोललं जात आहे. यासोबतच भारतीय विद्यार्थी आणि नागरिकांना मायदेशात परतण्यासाठी युक्रेनकडून केलं जात असलेल्या सहकार्याबाबत मोदींनी जेलेन्स्की यांचे आभार व्यक्त केले आहेत. युक्रेनच्या सुमी येथून भारतीय नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी युक्रेनच्या पाठिंब्याची मागणी केली आहे.
युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधल्यानंतर पंतप्रधान मोदी आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनाही फोन करणार असल्याची माहिती समोर आली आहे. दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी मोदी पुतीन यांना फोन करणार आहेत. युक्रेनमध्ये अजूनही अडकून असलेल्या भारतीयांच्या सुटकेच्या मुद्द्यावर मोदी पुतीन यांच्याशी चर्चा करणार असल्याचं सांगितलं जात आहे. कारण दोन्ही देशांमध्ये दिवसेंदिवस परिस्थिती अधिक चिघळत असताना भारतीय नागरिकांच्या सुरक्षेची चिंता आता व्यक्त केली जात आहे. यातच राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी कीव्ह, सुमी, खारकीव्ह आणि मारियूपोलमध्ये नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करता यावं यासाठी तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आहे. पुतीन यांच्या याच सहकार्याबाबत मोदी त्यांचे आभार व्यक्त करण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान मोदींनी याआधीही पुतीन यांच्याशी चर्चा केली होती. तसंच जेलेन्स्की यांच्याशीही चर्चा करण्याची मोदींची ही दुसरी वेळ होती. रशिया-युक्रेन युद्धाचा आज १२ वा दिवस आहे.