युक्रेन आणि रशिया सीमेवरील तणाव काहीसा निवळला असून जगावरील तिसऱ्या महायुद्धाचे ढगही कमी होऊ लागले आहेत. बुधवारी पॅरिसमध्ये चाललेल्या ८ तासांच्या बैठकीत रशियाने शस्त्रसंधीला होकार दिला आहे. याशिवाय युक्रेन आणि रशियाने 2019 नंतर प्रथमच युक्रेन सैन्य आणि फुटीरतावाद्यांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाबाबत फ्रान्स आणि जर्मनीसोबत संयुक्त निवेदन जारी करण्यास सहमती दर्शवली. या युद्धविरामात फ्रान्स आणि जर्मनीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
संयुक्त निवेदनात म्हटले आहे की दोन्ही बाजूंनी बिनशर्त युद्धविराम करण्यास सहमती दर्शविली आहे, याशिवाय बर्लिनमध्ये दोन आठवड्यांनंतर याच विषयावर दुसरी बैठक होणार आहे. फ्रान्सने या निर्णयाचे स्वागत केले आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या एका सहाय्यकाने सांगितले की, सतत वाढत असलेल्या तणावादरम्यान अखेर सकारात्मक बातमी समोर आली आहे.
रशियन मुत्सद्दी दिमित्री कोझाक यांनी सांगितले की, अनेक गोष्टींवर मतभेद असूनही, पूर्व युक्रेनमध्ये शस्त्रसंधीचा विचार केला जावा या मागणीवर आम्ही सकारात्मक आहोत. दोन आठवड्यांनंतर बर्लिनच्या बैठकीत पॅरिसप्रमाणेच दोन्ही देशांचे राजनयिक उपस्थित राहणार आहेत. आम्हाला आशा आहे की त्यांनी आमचा मुद्दा चांगला समजला असेल. त्याचा परिणामही येत्या दोन आठवड्यांत दिसून येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
रशियाने युक्रेनच्या पूर्व सीमेवर आपले सैन्य मोठ्या प्रमाणावर तैनात केले होते. त्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव खूप वाढला होता. रशियाच्या संभाव्य हल्ल्याचा धोका लक्षात घेऊन नाटो सैन्यानेही लष्करी हालचाली वाढवल्या. याशिवाय अमेरिकेचे 8500 सैनिकही हाय अलर्टवर आहेत.