नवी दिल्ली-
रशियानं युक्रेनविरोधात युद्धाची घोषणा केली आहे. युद्धावेळी वाजणाऱ्या सायरनचा आवाज आज टेलिव्हिजन वाहिन्यांच्या माध्यमातून भारतातील घरोघरी पाहायला मिळत आहे. युक्रेनच्या हवाई क्षेत्रात रशियन लढाऊ विमानांच्या घिरट्या घेणारे व्हिडिओ पाहून भारतीयांचीही चिंता वाढली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार १८ हजाराहून अधिक भारतीय नागरिक युक्रेनमध्ये अडकले आहेत. ७२ तासांपूर्वीच भारत सरकारनं युक्रेनमधून भारतीयांच्या घरवापसी मोहिमेला सुरुवात केली आहे. पण रशियानं हल्ल्याला सुरुवात केल्यामुळे आता भारतीय नागरिकांच्या सुटकेची मोहिम पूर्णपणे ठप्प पडली आहे. आज सकाळीच युक्रेनसाठी रवाना झालेलं एअर इंडियाचं विमान दिल्लीला माघारी परतलं. रशियानं युद्ध पुकारल्यामुळे युक्रेननं सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर देशाच्या हवाई क्षेत्रात प्रवासी विमानांना बंदी घातली आहे. रशिया-युक्रेन मुद्द्यावरुन दिल्लीत आज महत्त्वाची बैठक होत आहे. यासोबतच रशियन भाषा बोलू शकणाऱ्या अधिकाऱ्यांचाही केंद्र सरकारकडून शोध घेतला जात असून त्यांना युक्रेन आणि आसपासच्या परिसरात पाठविण्यात येत आहे.
कीवच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन भारतीय नागरिकांना घेऊन निघालेलं एअर इंडियाचं विमान आज सकाळी ७ वाजून ४५ मिनिटांनी दिल्लीत पोहोचलं. विमानातून १८२ भारतीय नागरिकांना परत आणण्यात आलं. यात विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज दिल्लीत उच्चस्तरीय बैठक होत आहे. रशियानं युद्धाची घोषणा केल्यानंतर भारतीय नागरिकांना सुखरुप मायदेशी आणण्यासाठीच्या सर्व पर्यायांवर चर्चा बैठकीत होणार आहे. युक्रेनकडून हवाई क्षेत्र बंद करण्यात आल्यानंतर इतर माध्यमांचा आणि पर्यायांचा विचार करण्यास सुरुवात झाली आहे. तसंच रशियन भाषा बोलू शकरणाऱ्या भारतीय अधिकाऱ्यांना युक्रेनमधील दूतावासात पाठविण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे. युक्रेनमधील भारतीय दूतावास पूर्णपणे काम करत असून दूतावासाकडून जारी करण्यात आलेल्या नियमावलींचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन सरकारनं केलं आहे. युक्रेनमध्ये युद्धाची घोषणा झाल्यानंतर राजधानी कीवच्या दिशेनं येणाऱ्या भारतीय नागरिकांना त्यांच्या त्यांच्या राहत्या ठिकाणी परत जाण्याचं आवाहन दूतावासाकडून करण्यात आलं आहे. कारण रशियाकडून कीव शहरालाच मोठ्या प्रमाणात लक्ष्य करण्यात येत आहे. त्यामुळे कीव शहराकडे न येण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
याआधी मंगळवारी एअर इंडियाच्या फ्लाइट AI1947 मधून कीव येथून २५० हून अधिक नागरिकांना भारतात आणण्यात आलं होतं. या आठवड्यात आज आणि शनिवारी दोन आणखी विमानं युक्रेनला पाठविण्यात येणार होती. पण युद्धाची घोषणा झाल्यानं हवाई मार्ग बंद झाला आहे.