युक्रेनवर हल्ला केलेल्याची शिक्षा आता रशियाला मिळू लागली आहे. एकीकडे युक्रेन काही हाती येईना, दुसरीकडे प्रचंड नुकसान सहन करावे लागत आहे. रशियाची सर्वात जुनी युद्धनौका उद्ध्वस्त झालेली असताना काळ्या समुद्रातून आणखी एक खळबळजनक माहिती येत आहे. आणखी एक रशियन युद्धनौका समुद्र तळाशी जाऊन विसावली आहे.
युक्रेनला घेरण्यास गेलेली रशियाचे जहाजे आता संकटात सापडली आहेत. रात्रीच्या अंधारात युक्रेनी सैन्याने केलेल्या हल्ल्यात रशियाची दुसरी युद्धनौका उद्ध्वस्त झाली आहे. युक्रेनी खासदाराने हा दावा केला आहे. काऊंसिल ऑफ ओडेसाचे प्रमुख ओलेक्सी गोंचारेंकोने आपल्या टेलिग्राम चॅनलवर याची माहिती दिली आहे. गोंचारेंको यांनी म्हटलेय की, रशियाची गस्तीवरील युद्धनौका मकारोव संपली आहे. समुद्राच्या देवतेने युक्रेनच्या गुन्हेगारांचा बदला घेतला आहे. युद्धनौका वाईट पद्धतीने उद्ध्वस्त झाली आहे.
ओडेसामध्येच युक्रेनच्या नौदलाचा एक मोठा तळ आहे. डेलीमेलने दिलेल्या वृत्तानुसार गोंचारेंकोने आपल्या टेलिग्राम चॅनेलवर एडमिरल मकारोव उद्ध्वस्त केल्याचा दावा केला आहे. जवळपास ३८ अब्ज रुपयांची ही युद्धनौका पाच वर्षांपूर्वीच रशियन ताफ्यात आली होती. स्नेक आयलँडजवळ या युद्धनौकेवर युक्रेनी मिसाईलने हल्ला चढविण्यात आला होता.
आपल्या युद्धनौकेवर हल्ला झाल्याचे समजताच रशियाने मदतीसाठी रेस्क्यू जहाजे आणि विमाने पाठविली आहेत. काळ्या समुद्रातील सेवस्तोपोल बंदरावरून मदत निघाली आहे. मकारोववर हल्ला झाल्याचे वृत्त खरे असेल तर रशियाला हा मोठा धक्का असणार आहे. अद्याप युक्रेनने या घटनेची घोषणा केलेली नाही.