Russia Ukraine Ceasefire: रशिया-युक्रेन युद्ध इस्रायल थांबवणार! पुतीन-जेलेन्स्की यांच्या भूमिकेत नरमाई, मान्य कराव्या लागणार 'या' अटी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2022 01:20 PM2022-03-09T13:20:14+5:302022-03-09T13:21:03+5:30
Russia Ukraine Ceasefire: रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या १४ दिवसांपासून सुरू असलेलं युद्ध आता शमण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इस्रायल, भारत आणि फ्रान्सच्या नेतृत्त्वाकडून केल्या गेलेल्या प्रयत्नांना आता यश येत असल्याचं दिसून येत आहे.
Russia Ukraine Ceasefire: रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या १४ दिवसांपासून सुरू असलेलं युद्ध आता शमण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इस्रायल, भारत आणि फ्रान्सच्या नेतृत्त्वाकडून केल्या गेलेल्या प्रयत्नांना आता यश येत असल्याचं दिसून येत आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी नरमाईची भूमिका घेतली आहे. पश्चिमी देशांकडून अपेक्षित साथ न मिळाल्यानं आणि रशियन सैन्य आता कीव्हच्या खूप जवळ पोहोचल्यानं जेलेन्स्की यांनी आता 'नाटो'मध्ये सामील होण्याची इच्छा उरलेली नसल्याचं म्हटलं आहे. दुसरीकडे रशियानंही पश्चिमी देशांकडून लावण्यात आलेले निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर आमची फक्त डोनबासमधून युक्रेनी सैन्य हटवलं जावं अशी मागणी असल्याचं म्हटलं आहे.
रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेली युद्धविराम चर्चा गुंतागुंतीच्या टप्प्यावर पोहोचल्याचे इस्रायली अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. इस्रायली अधिकाऱ्यांचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे जेव्हा पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी झेलेन्स्की आणि पुतीन यांच्याशी अनेकदा चर्चा केली आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष आणि पुतिन यांच्यात बेनेट यांच्या माध्यमातून अप्रत्यक्ष चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. खरं तर इस्रायलचे युक्रेन आणि रशिया या दोन्ही देशांशी खूप चांगले संबंध आहेत. यामुळेच इस्रायल रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांमध्ये समेट घडवून आणण्याच्या स्थितीत आहे.
गेल्या 24 तासांत दोन्ही बाजूंच्या भूमिकेत नरमाई
"गेल्या २४ तासांत दोन्ही बाजूंची भूमिका लक्षणीयरीत्या नरमली आहे. रशियाने केवळ डॉनबास भागातून सैन्य मागे घ्यायची मागणी केली आहे. दुसरीकडे, जेलेन्स्की यांनी आता युक्रेनला नाटोमध्ये सामील होण्याची इच्छा राहिलेली नाही. कोणाच्याही समोर गुडघे टेकून भीक मागणाऱ्या देशाचा अध्यक्ष व्हायचे नाही, असे म्हणत जेलेन्स्की यांनी नाटोवर हल्लाबोल केला. हा वाद लवकरच मुत्सद्दी मार्गाने सोडवला जाण्याची चिन्हे आहेत", असं पुतीन आणि जेलेन्स्की यांच्यात झालेल्या चर्चेत थेट सहभागी असलेल्या इस्रायली अधिकाऱ्यांनं सांगितलं.
तत्पूर्वी शनिवारी इस्रायलचे पंतप्रधान बेनेट यांनी मॉस्कोला भेट देऊन पुतीन यांची भेट घेतली. तेव्हापासून, बेनेट यांनी पुतीन, फ्रान्सचे अध्यक्ष आणि जर्मन चान्सलर यांच्याशी फोनवर अनेकदा बोलले आहेत. मंगळवारी, बेनेट यांनी जेलेन्स्की यांच्याशी सुरू असलेल्या युद्धविराम प्रयत्नांबद्दल बोलले आणि पुतिन यांना फोनद्वारे त्यांचा संदेश दिला.
'जेलेन्स्कीसाठी रशियन अटी फार कठीण नाहीत'
"युद्ध थांबवण्याची कोणतीही योजना समोर आलेली नाही, परंतु आम्ही पुतिन आणि जेलेन्स्की यांचं म्हणणं एकमेकांपर्यंत पोहोचवत आहोत. पुतीन यांच्यासोबत झालेल्या भेटीदरम्यान बेनेट यांनी त्यांना युक्रेन आणि इतर देशांकडून आलेल्या सूचनांबद्दल सांगितलं. पुतिन युद्धविरामसंदर्भातील त्यांच्या ताज्या अटींबाबत लवचिक दृष्टीकोन अवलंबत आहेत का, याचेही मूल्यांकन करता येईल. बेनेट यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनाही या संपूर्ण घटनेची माहिती दिली आहे", असंही इस्रायलचे अधिकारी म्हणाले.
पुतीन यांनी ठेवलेल्या अटी मान्य करणं जेलेन्स्की यांना कठीण आहे. पण अशक्य नाही. पुतीन यांनी दिलेल्या प्रस्तावात युक्रेनमधील सत्ताबदलाचा कोणताही उल्लेख नसल्याचंही इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. इतकंच नव्हे, तर पुतीन यांनी युक्रेनला त्याचे सार्वभौमत्व देण्याच्या बाजूनं आपलं मत मांडलं आहे. जेलेन्स्की सध्या आता एका पेचात सापडले असून नेमकं कोणता निर्णय घ्यावा, कोणता मार्ग निवडावा हे ठरवण्याचं आव्हान त्यांच्यासमोर असल्याचंही इस्रायलचे अधिकारी म्हणाले. रशियाची ऑफर स्वीकारणं जेलेन्स्की यांना कठीण आहे. पण युक्रेनचे सार्वभौमत्व टिकून राहण्यासाठी व युद्ध थांबविण्यासाठी त्यांना एक पाऊल मागे यावं लागणार आहे. जेलेन्स्की यांनी जर प्रस्ताव नाकारला तर याचे गंभीर परिणाम होतील अशीही शक्यता वर्तवली आहे.