मॉस्को - रशिया आणि युक्रेनच्या सीमेवर दाटलेले युद्धाचे ढग अधिकच गडद झाले आहेत. युक्रेनच्या सीमेवर तब्बल १ लाख ३० हजारांहून अधिक सैनिकांची तैनाती झाली आहे. तसेच रशियाने शेकडो टँक, मिसाईल, लढाऊ विमाने तैनात केली आहेत. समोर येत असलेल्या वृत्तानुसार रशियाने युक्रेनला तिन्ही बाजूंनी घेरले आहे. तर अमेरिकेने वर्तवलेल्या अंदाजानुसार १६ फेब्रुवारी रोजी युक्रेनवर हल्ला करण्याची शक्यता आहे.
अमेरिका आणि युरोपीय देशांकडून रशियावर निर्बंध लावण्याचा इशारा देण्यात आला आहे. मात्र रशियावर त्याचा परिणाम झालेला नाही. रविवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जे बायडन यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी चर्चा केली होती. त्यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांच्याशीही चर्चा केली होती.
अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात युक्रेनच्या सीमेवर १ लाख रशियन सैनकांची तैनाती झाल्याची माहिती दिली होती. मात्र आता अधिकाऱ्यांनी सांगितले की, युक्रेनच्या सीमेवर रशियाचे १ लाख ३० हजारांहून अधिक सैनिक तैनात आहेत. यामधील १.१२ लाख जवान लष्कर आणि १८ हजार जवान नौदल आणि हवाई दलाचे आहेत.
यादरम्यान, सीएनएनच्या रिपोर्टनुसार रशियाने युक्रेनला तिन्ही बाजूंनी घेरले आहे. यामध्ये दक्षिणेत क्रिमिया आणि उत्तरेमध्ये बेलारूसकडून युक्रेनला घेरले आहे. तर युक्रेनला लागून असलेल्या सीमेवरही रशियाने सैनिक तैनात केले आहे. अमेरिकेच्या रिपोर्टनुसार रशिया युक्रेनवर कधीही हल्ला करू शकतो.
दरम्यान, युक्रेनलाही अनेक पाश्चात्य देशांकडून पाठिंबा मिळत आहे. अमेरिका, ब्रिटनसह युरोपियन देश आणि नाटो युक्रेनसोबत आहे. युक्रेनचे संरक्षणमंत्री ओलेस्की रेजनीकोव्ह यांनी ट्विट करून सांगितले की, आतापर्यंत १५०० टन एवढी लष्करी सामुग्री मिळाली आहे. यामध्ये हत्यारे, ग्रेनेड आणि दारुगोळ्याचा समावेश आहे.