Russia-Ukraine Conflict: धक्कादायक! एअरस्ट्राइकमध्ये युक्रेनच्या १६ वर्षीय खेळाडूचा मृत्यू; रशियाचे हल्ले सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2022 08:39 AM2022-03-09T08:39:00+5:302022-03-09T08:39:45+5:30
Russia-Ukraine Crisis: गेल्या सलग १४ दिवसांपासून रशियाचे युक्रेनच्या विविध भागांवर भीषण हल्ले सुरूच आहेत.
Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा १४ वा दिवस आहे. तरीही रशियाचे युक्रेनमधील विविध भागांवर भीषण हल्ले सुरूच आहेत. युद्ध थांबावे, यासाठी विविध स्तरांतून प्रयत्न केले जात आहेत. या गंभीर परिस्थितीतून आपापल्या नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी अनेक देशांचे प्रयत्न सुरू आहेत. या युद्धातून अजूनही रशियाला काहीही साध्य झालेले नाही. मात्र, तरीही विध्वंस सुरूच आहे. यातच आता रशियाच्या एअरस्ट्राइकमध्ये युक्रेनमधील १६ वर्षीय खेळाडू त्याच्या पूर्ण कुटुंबासह ठार झाल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रशियाने युक्रेनच्या सुमीसह अन्य ठिकाणांवर एअरस्ट्राइक केल्याचे सांगितले जात आहे. या एअरस्ट्राइकमध्ये युक्रेनचा सुमी येथे राहणाऱ्या एका १६ वर्षीय खेळाडूचा मृत्यू झाला आहे. अर्टोम प्रिमेंको असे मृत्यू पावलेल्या खेळाडूचे नाव आहे. इतकेच नव्हे तर या हल्ल्यात प्रिमेंकोच्या संपूर्ण कुटुंबीयही मारले गेले आहेत. अर्टोम प्रिमेंको हा रशियन मार्शल आर्टमधील एक प्रसिद्ध सांबो या क्रीडा प्रकारातील युक्रेनचा चॅम्पियन होता, असे सांगितले जात आहे.
विदेशी चलनाच्या विक्रीवर बंदी
रशियाने विदेशी चलनाच्या विक्रीवर बंदी घातली आहे. ग्राहक त्यांच्या खात्यातून १०,००० पर्यंत विदेशी चलन काढू शकतील. इतर सर्व निधी आता स्थानिक चलनात दिले जातील. दुसरीकडे, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्याशी चर्चा केली. लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासह जीवनावश्यक वस्तू लोकांपर्यंत पोहोचवण्याबाबतही चर्चा झाली. त्याच वेळी, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी जाहीर केले की, अमेरिका यापुढे रशियाकडून तेल आणि वायू आयात करणार नाही. याचा फटका अमेरिकेलाही बसणार असल्याचे त्यांनी मान्य केले. तत्पूर्वी, रशियाने युक्रेनमध्ये मानवतावादी युद्धविराम जाहीर केला आहे. कीव्ह, चेर्निहाइव्ह, सुमी, खार्कीव्ह आणि मारियुपोल येथील कॉरिडॉरची माहिती युक्रेनच्या संबंधित अधिकाऱ्यांना पाठविली जाईल. युद्धबंदी दरम्यान युद्धग्रस्त भागात अडकलेल्या लोकांना बाहेर काढले जाईल, असे रशियाने म्हटले आहे.
दरम्यान, एकीकडे रशियाने युक्रेनवर हल्ले सुरू केल्यानंतर जगातील विविध देशांनी निर्बंध लादण्यास सुरुवात केली. आर्थिक निर्बंधांसह अनेक गोष्टींवर बंदी आणण्यात आली. अनेक बड्या कंपन्यांनी आपली उत्पादन रशियात विक्री करणार नसल्याचे सांगितले आहे. एकूणच या कृतीमुळे रशियाची कोंडी करण्याचा प्रयत्न अन्य देशांकडून सुरू करण्यात आला आहे. दुसरीकडे, जागतिक बँकेने युक्रेनसाठी ७२ कोटी ३० लाख डॉलर्सचे कर्ज आणि अनुदानाचे पॅकेज मंजूर केले आहे.