Russia-Ukraine Crisis: युक्रेनचे रशियाला प्रत्युत्तर! ५ लढाऊ विमानं, २ हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा; ‘या’ भागावर ताबा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 04:54 PM2022-02-24T16:54:29+5:302022-02-24T16:56:28+5:30
Russia-Ukraine Crisis: युक्रेनने केलेल्या प्रतिहल्ल्यात रशियाचे ५० जवान मारले गेल्याचा दावा करण्यात आला आहे.
Russia-Ukraine Conflict: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनवर लष्करी कारवाई करण्याचे निर्देश दिल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. रशियाने युक्रेनच्या काही भागांवर केलेल्या हल्ल्यांना युक्रेननेही प्रत्युत्तर दिले आहे. रशियाचा प्रतिकार करताना रशियाची ५ लढाऊ विमाने, २ हेलिकॉप्टर, २ टँक आणि अनेक ट्रक जमीनदोस्त केल्याचा मोठा दावा केला आहे.
रशिया आणि युक्रेनमधील वाद चर्चेच्या माध्यमातून मिटवण्यासाठी प्रयत्न सुरु असतानाच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनमध्ये लष्करी कारवाई करण्याची घोषणा केली. युक्रेन आणि रशियामधील युद्ध टाळले जाऊ शकत नाही, असेही पुतिन यांनी स्पष्ट केले. रशिया आणि युक्रेनमधील या तणावावर संपूर्ण जगाचे लागले आहे. युक्रेनने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेही मदत मागितल्याची माहिती मिळाली आहे.
युक्रेनच्या लष्कराने Shchastya प्रांत घेतला ताब्यात
युक्रेनच्या लष्कराने Shchastya प्रांत ताब्यात घेतला आहे. रशियाची ५ लढाऊ विमाने आणि २ हेलिकॉप्टर आम्ही पाडल्याचा दावा युक्रेनने केला आहे. युक्रेनमधील लुहान्स प्रांतामध्ये आम्ही ही विमाने पाडल्याचा दावा युक्रेनने केला आहे. लुहान्स्क हा युक्रेनमधील बंडखोर प्रांतांपैकी एक आहे. याच आठवड्यामध्येच रशियाने लुहान्स्कला वेगळा देश म्हणून घोषित केले आहे. युक्रेनच्या उत्तरेकडून रशियाने हल्ला केला असून, रशियन सैन्य युक्रेनच्या भूप्रदेशात शिरले आहे. राजधानी कीव आणि दुसरे सर्वात महत्त्वाचे शहर असणाऱ्या कारकीवमधील लष्करी तळांवर रशियाने मिसाइलने हल्ला केल्याचे युक्रेनच्या गृहमंत्रालयाने म्हटले आहे. मात्र, त्यावेळी त्यांनी उत्तरादाखल केलेल्या प्रतिहल्ल्यात ५ लढाऊ विमाने पाडल्याचा दावाही केला. याशिवाय युक्रेनच्या प्रतिहल्ल्यात रशियाचे ५० जवान मारले गेल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, रशियाने लष्करी कारवाईची घोषणा करतानाच युक्रेनची राजधानी कीव आणि पूर्वेकडील बंदरावरील शहर मारीऊपॉल येथे स्फोटांचे आवाज ऐकू येत होते. अनेक शहरांमध्ये धोक्याचे सायरन वाजवत युक्रेनने सतर्कतेचा इशारा दिला आहे. एकीकडे नागरिकांना इशारा देताना दुसरीकडे आम्ही पूर्ण ताकदीने लढणार आहोत, असे युक्रेनने आधीच स्पष्ट केले आहे.