लोकमत न्यूज नेटवर्क : युक्रेनची राजधानी कीव्हच्या दिशेने रशियन सैन्य प्रचंड वेगाने आगेकूच करत आहे. कदाचित एक-दोन दिवसांत कीव्हवर कब्जाही मिळवला जाईल. त्यानंतर एकतर्फी युद्धबंदी घोषित करत रशिया युक्रेनमध्ये कठपुतळी सरकार स्थापन करेल. परंतु पुढे काय? हे सरकार कितपत टिकू शकेल? युद्ध जिंकूनही रशिया पराभवाच्या छायेतच राहील, अशी शंका आहे.
काय सांगतो पूर्वेतिहास?
- दुसऱ्या महायुद्धात तत्कालीन यूएसएसआर, अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटन ही दोस्त राष्ट्रे जर्मनीविरोधात एकत्र आल्याने जर्मनीचा पराभव झाला.
- युद्ध समाप्तीनंतर बर्लिन शहराचा ताबा दोस्त राष्ट्रांकडे गेला. १९४९ मध्ये जर्मनी दोन भागांत विखुरला गेला. पूर्व जर्मनी कम्युनिस्ट रशियाच्या अधिपत्याखाली गेला तर पश्चिम जर्मनी लोकशाहीप्रधान युरोपीय देशांच्या पंक्तीत जाऊन बसला.
- राजधानी बर्लिनचेही दोन तुकडे झाले. १९६१ मध्ये तत्कालीन रशियन अध्यक्ष निकिता ख्रुश्चेव्ह यांनी बर्लिनची भिंत बांधली. तेव्हापासून जर्मनीच्या मनात रशियाविषयी अढी निर्माण झाली.
- १९८९ मध्ये जर्मनीचे एकीकरण झाले. मात्र, आजही पश्चिम जर्मनीच्या तुलनेत पूर्व जर्मनी मागासलेला आहे.
- ५७ टक्के पूर्व जर्मनीतील लोक अजूनही स्वत:ला दुय्यम दर्जाचे नागरिक समजतात. हे सर्व रशियामुळे झाल्याची त्यांची भावना आहे.
- आताही युक्रेनमध्ये जर्मनीसारखीच स्थिती आहे. रशियाचा द्वेष करणाऱ्या युक्रेनियन नागरिकांची संख्या २००८ मध्ये ९ टक्के होती.
- २०१० पासून रशियाविषयीचा द्वेष वाढीस लागला. रशियाच्या आक्रमक धोरणामुळे २०२१ मध्ये ही संख्या ५० टक्क्यांहून अधिक झाली.
कठपुतळी सरकार?
- कीव्हचा पाडाव केल्यानंतर रशिया युक्रेनमध्ये बाहुले सरकार स्थापन करू शकेल.
- परंतु या कठपुतळी सरकारचे युक्रेनच्या नागरिकांवर कितपत नियंत्रण राहील, याबाबत साशंकता आहे.
- कालांतराने युक्रेन रशियाचा दबाव झुगारून देत नाटोमध्ये सहभागी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. तसे झाल्यास सध्या जिंकूनही रशियाची पराभूतासारखी अवस्था होईल.
ही उद्भवू शकते स्थिती
- युक्रेनच्या पूर्वेकडे रशियन समर्थकांची संख्या अधिक आहे.
- त्या तुलनेत पश्चिम युक्रेनमध्ये युरोपधार्जिण्या लोकांची संख्या लक्षणीय आहे.
- रशिया एकतर्फी युद्धबंदी जाहीर करून पूर्व युक्रेनला आपल्या ताब्यात आणण्याचा प्रयत्न करेल.
- क्रिमियावर ताबा आहेच. लुहान्स्क आणि दोनेत्स्क या प्रांतांवरही रशिया कब्जा सांगेल.
- पश्चिम युक्रेन युरोपकडे तोंड करून उभा राहील.