Russia-Ukraine Conflict: रशियावरील निर्बंधांचे नेतृत्व भारतीय वंशाचे दलिप सिंग यांच्याकडे; पुतिन यांच्या अडचणी वाढणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2022 08:53 AM2022-03-05T08:53:35+5:302022-03-05T08:54:21+5:30
Russia-Ukraine Conflict: दलिप सिंग पुतिन यांना बायडेन यांचा कसा प्रतिसाद आहे हे सांगण्यासाठी व्हाईट हाऊसमध्ये आले होते.
न्यूयॉर्क : रशिया आणि अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या अंतर्गत गोटावरील अमेरिकन निर्बंधांचे नेतृत्व अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांचे वरिष्ठ भारतीय अमेरिकन सल्लागार दलिप सिंग करीत आहेत. रशियाने युक्रेनमध्ये नुकत्याच केलेल्या हल्ल्यांमुळे हे निर्बंध आहेत.
दलिप सिंग हे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र) आणि उपराष्ट्रीय आर्थिक परिषदेचे संचालक आहेत. मंगळवारी दलिप सिंग पुतिन यांना बायडेन यांचा कसा प्रतिसाद आहे हे सांगण्यासाठी व्हाईट हाऊसमध्ये प्रेस ब्रिफिंगसाठी आले होते.
“युक्रेनवरील रशियाचे आक्रमण घडले असून आता आमच्याकडूनही प्रतिसाद सुरू झाला आहे. आज अध्यक्षांनी वेगवान प्रतिसाद दिला असून मित्र देशांसोबत पावले उचलली आहेत,” असे दलिप सिंग म्हणाले. गती आणि समन्वय ऐतिहासिक असून पूर्वीच्या राजवटीतील निर्बंधांचे निर्णायक परिणाम घडून यायला आठवडे आणि महिनेही लागले होते, असेही ते म्हणाले.
यावेळी आम्ही एका दिवसाच्या आत आर्थिक निर्बंधांचा पहिला भाग जाहीर केला आणि युरोपियन युनियनमधील मित्र आणि इंग्लंड, कॅनडा, जपान आणि ऑस्ट्रेलिया या भागीदारांसोबत एकत्रित उपाय करीत आहोत, असे सिंग म्हणाले. आक्रमणाची ती सुरुवात होती आणि त्यावरील आमच्या प्रतिसादाची ही सुरुवात आहे. आज आम्ही केलेले उपाय हे केवळ पहिल्या टप्प्यातील आहेत, असे दलिप सिंग म्हणाले.
तर आर्थिक निर्बंध आणखी वाढवू
“व्लादिमिर पुतिन हे आणखीही पुढे गेले तर आम्ही आर्थिक निर्बंध आणि निर्यातीवरील नियंत्रणे आणखी वाढवू. ती काय असतील ते आम्ही अजून जाहीर केलेले नाही तरी ते पूर्णपणे अमलात आणण्यासाठी मित्र आणि भागीदारांसोबत आम्ही तयार आहोत,” असे सिंग म्हणाले.