रशिया-युक्रेन मुद्द्यावर भारताने आपली स्वतंत्र आणि निष्पक्ष भूमिका कायम ठेवली आहे. पण अमेरिका आणि ब्रिटनसह अनेक देश रशियाच्या हल्ल्यावर टीका करण्यासाठी भारतावर सातत्याने दबाव आण्याचा प्रयत्न करत आहेत. अमेरिकेचे माजी राजदूत अतुल केशप यांनी मात्र भारताच्या स्थितीवर सकारात्मक भाष्य केले आहे. भारताची काही मजबुरी आहे आणि शेजारील चीनसोबतही वाद आहेत, असे त्यांनी अमेरिकन खासदारांशी बोलताना सांगितले.
अतुल केशप यांनी परराष्ट्र विभागात भारतासाठी चार्ज डी अफेयर्ससह अनेक पदांवर काम केले आहे आणि आता ते यूएस-इंडिया बिझनेस काउंसिल (USIBC)चे अध्यक्ष आहेत. हाऊस फॉरेन अफेयर्स कमेटीने आयोजित केलेल्या इंडो-पॅसिफिकसंदर्भातील एका कार्यक्रमादरम्यान, 'युक्रेनवर रशियन हल्ल्याचा निषेध नोंदविण्यासाठी झालेल्या अनेक व्होटिंगपासून भारत दूर राहिला आहे. यावर आपले काय मत आहे?' असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता.
या प्रश्नाला उत्तर देताना केशप म्हणाले, 'रशियाचा विचार करता भारताची काही मजबुरी आहे. शेजारील चीनसोबत भारताचे काही मुद्द्यांवर वाद आहेत. मला वाटते, की आपण अमेरिकन्स आणि भारतीयांची लोकशाही व त्यांची व्यवस्था एक सारखीच आहे.'
केशप म्हणाले, 'आपल्याला जगातील दोन सर्वात महान लोकशाहींच्या शक्तीचा परिचय द्यायचा आहे. यासाठी आपल्याला या मुद्द्यांवर मैत्रीपूर्ण पद्धतीने काम करायचे आहे. यात अनेक प्रसंग येतील, मात्र आपण जोवर एकमेकांशी मित्रत्वाच्या नात्याने बोलू, मला विश्वास आहे, की आपण यातून बाहेर पडू आणि मजबूत होऊ.'