Russia-Ukraine Conflict: खार्कीव्हमध्ये भारतीयांची अडवणूक; पालकांच्या चिंतेत भर, केंद्राने तातडीने पाऊल उचलण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 09:07 AM2022-03-03T09:07:57+5:302022-03-03T09:09:08+5:30
Russia-Ukraine Conflict: स्थानिकांना प्राधान्य दिल्याने तिथे अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांचा धोका अधिक वाढला असल्याचे सांगितले जात आहे.
सूर्यकांत वाघमारे, लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : खार्कीव्हत शहरात अडकलेले विद्यार्थी प्राण धोक्यात घालून खार्कीव्ह रेल्वेस्थानकापर्यंत पोहोचले आहेत. मात्र त्याठिकाणी सैन्याकडून भारतीयांसह इतरांची अडवणूक करून स्थानिकांना शहराबाहेर काढण्यात प्राधान्य दिले जात आहे. यामुळे सात तासांहून अधिक वेळ तिथे अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांचा धोका अधिक वाढला असून, त्यात नवी मुंबईच्याही विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
युक्रेनमधील युद्धाच्या परिस्थितीमुळे खार्कीव्ह शहरात नवी मुंबईचे अनेक विद्यार्थी अडकले आहेत. बुधवारी पहाटे त्यांना हॉस्टेलमधून सुरक्षित ठिकाणी जाण्याचे सांगण्यात आले होते. यामुळे सुमारे १२०० विद्यार्थ्यांनी गोळीबार व मिसाईल हल्ले यातून स्वतःला वाचवीत सुमारे १२ किमीचे अंतर पार करून खारकीव्ह रेल्वेस्थानक गाठले. त्या ठिकाणावरून त्यांना रेल्वेने हंगेरी सीमेपर्यंत सोडले जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र खार्कीव्ह स्थानकात पोहोचूनही त्यांना रेल्वेने प्रवासात अडविले जात असल्याचे तिथे अडकलेल्या दक्षा कानडे हिने पालकांना कळविले. अशातच खार्कीव्ह स्थानकाच्या आवारातही गोळीबार, स्फोटाचे आवाज घुमू लागले आहेत. यामुळे वेळीच त्या विद्यार्थ्यांना रेल्वेने हलविले न गेल्यास त्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो, अशी चिंता तिचे पालक प्रदीप कानडे यांनी व्यक्त केली आहे. सात तासांहून अधिक वेळ १२०० विद्यार्थी खार्कीव्ह स्थानकात अडकून पडलेले असतानाही, त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी ठोस पाऊल उचलले जात नसल्याचा संतापही त्यांनी व्यक्त केला आहे. यामुळे पालकांच्या चिंतेत भर पडत आहे.
पेणचा आर्यन पाटील युक्रेनहून घरी सुखरूप परतला
युक्रेन येथे एमबीबीएसच्या शिक्षणासाठी गेलेला पेणमधील आर्यन पाटील हा विद्यार्थी घरी सुखरूप पोहोचल्याने कुटुंबातील सदस्यांचा व त्याच्या मित्रपरिवाराचा आनंद गगनात मावेनासा झाला. झिराळ आळी येथे राहणारा आर्यन हा विद्यार्थी एमबीबीएस शिक्षणासाठी युक्रेन येथील विनिसटिया शहरातील, प्रीग्रोव्ह मेमोरिअल मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत होता. सुरू असलेल्या युद्धात आर्यन इतर विद्यार्थ्यांसोबत तिकडे अडकला होता. मात्र, मंगळवारी तो घरी पोहोचला. माजी नगराध्यक्षा प्रीतम पाटील, नगरसेवक अजय क्षीरसागर यांनी आर्यनची विचारपूस केली.